विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदाबाद-लंडन विमान अपघातावर तीव्र शोक व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत.
( The entire Maharashtra shares the grief of the accident victims Chief Minister Devendra Fadnavis expressed condolences to the families of the deceased.)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, हा विमान अपघात रहिवासी भागात झाल्याने त्याची भीषणता अधिकच वाढली आहे. या घटनेने संपूर्ण देश दुःखात बुडाला आहे. या अपघातामध्ये अनेक कुटुंबांनी आपल्या घरातील कर्ते आणि जीवलग गमावले असून संपूर्ण महाराष्ट्र या दुःखात सहभागी आहे. या कठीण प्रसंगातून त्यांना सावरण्याची शक्ती मिळावी, अशी प्रार्थनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी या अपघाताची गांभीर्याने दखल घेऊन यंत्रणांना तात्काळ कृती करण्याचे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्र सरकारच्या सर्व यंत्रणा आणि नागरिक या आपत्तीच्या काळात गुजरातमधील प्रशासनासोबत ठामपणे उभ्या आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
विमान अपघातात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. विमान अपघातात पंढरपूरच्या दाम्पत्याचा मृत्यू झाला. ते मुलाला भेटण्यासाठी लंडनला जात असताना काळाने त्यांच्यावर घाला घातला. महादेव तुकाराम पवार (६७) आणि त्यांच्या पत्नी आशा महादेव पवार (५५) या दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लंडनला मुलाला भेटण्यासाठी जात ते जात होते. पवार कुटुंब हे सध्या अहमदाबादमध्ये स्थायिक झाले होते. त्यांचा एक मुलगा अहमदाबादमध्ये राहतो. दुसरा मुलगा लंडनमध्ये बेकरीचा व्यवसाय करतो.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या भाचेसून अपर्णा महाडिक यांचाही या अपघातात मृत्यू झाला आहे. त्या विमानाच्या क्रू मेंबर होत्या. एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी करत असलेल्या एका तरुणाचा संपर्क होत नसल्याची माहिती समोर आली आहे. बदलापूरच्या दीपक पाठक यांचाही यात समावेश आहे. दीपक पाठक हे गेल्या ११ वर्षांपासून एअर इंडियामध्ये केबीन क्रू म्हणून नोकरी करत होते. दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेनंतर त्यांचा कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.