विशेष प्रतिनिधी
पुणे : ‘फुले’ या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट एकतर्फी नसावा. चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो
त्याचप्रमाणे त्याकाळी ब्राह्मण महासंघाने केलेली. मदतही चित्रपटात दाखवा, अशी मागणी त्यांनी केली.
( The film may increase caste disputes againBrahmin Federation leader objects to the film Phule)
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अनंत महादेवन दिग्दर्शित प्रतीक गांधी आणि पत्रलेखा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ‘फुले’ या चित्रपटावर ब्राह्मण महासंघाचे नेते आनंद दवे यांनी आक्षेप घेतला आहे. चित्रपट एकतर्फी नको, सर्वसमावेश असावा, अशी मागणी दवेंनी केली आहे. त्याकाळी ब्राह्मण समाजानं केलेली मदतही चित्रपटात दाखवा, असं ते म्हणाले. चित्रपटामुळे पुन्हा जातीय वाद वाढू शकतो, अशी शक्यता देखील त्यांनी वर्तवली आहे. ‘फुले’ हा चित्रपट महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या समाजसुधारणेच्या संघर्षमय वाटचालीवर आधारित आहे. यामध्ये ‘स्कॅम 1992’ वेब सीरिज फेम प्रतीक गांधी महात्मा फुलेंच्या आणि अभिनेत्री पत्रलेखा ही सावित्रीबाई फुलेंच्या भूमिकेत आहे.
याविषयी आनंद दवे म्हणाले, “शाळेसाठी जागा देणारे भिडे असो, शिक्षक म्हणून जाणारे काही ब्राह्मण असो, स्वत:ची मुलं विद्यार्थी म्हणून पाठवणारी लोकं असो.. असं अनेकांनी सहकार्यसुद्धा केलंय. मग तुम्ही ते दाखवणार आहात का किंवा ते दाखवलं आहे का, असा माझा सवाल आहे. हा चित्रपट एकतर्फी नसावा. अनंत महादेवन हे दिग्गज दिग्दर्शक आहेत, त्यांच्याकडून अशी गल्लत झाली नाही ना? आम्ही काल निर्मात्यांशीही बोललो. आम्ही तुम्हाला उद्यापर्यंत कळवतो की काय करता येईल, असं त्यांनी सांगितलं आहे. आताचं महाराष्ट्रातील राजकारण खूप जातीयवादी झाल्याने या चित्रपटातून पुन्हा एकदा जातीय द्वेष पसरू नये, अशी आमची भूमिका आहे. जे जे घडलं असेल, ते सगळं दाखवण्याची हिंमत असेल तरच हा चित्रपट काढावा. आमचा या चित्रपटाला वैचारिक विरोध नाही.”
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले, महात्मा जोतिराव फुले या सिनेमात जे काही दाखविले जात आहे; ते ऐतिहासिक सत्य आहे. ते नाकारून सत्य बदलता येणार नाही. या देशात जे समाजसुधारक झाले, त्यामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीमाई फुले या दाम्पत्याचे नाव अग्रस्थानी आहे. जे सत्य आहे ते दाखवावेच लागेल. चित्रपटातून सत्य वगळण्यात यावे, यासाठी सिनेमा निर्मात्यावर दबाव आणला जात आहे. चित्रपट निर्मात्यांनी या दबावाला बळी पडू नये. जे सत्य आहे ते जगासमोर आलेच पाहिजे. ज्यांनी फुले दाम्पत्याला मदत केली असेल तर त्याचाही उल्लेख असायला हवा. मग, तो कोणत्याही जाती-धर्माचा असो; त्यालाही विरोध होता कामा नये. इतिहास बदलता येत नाही. मात्र, इतिहासातील चुका सुधारतच समाज पुढे जात असतो.