विशेष प्रतिनिधी
मुंबई : दोन्ही भाऊ 20 वर्षांनी एकत्र आले त्याचा आनंद आहे. मात्र याचा महायुतीला जास्त फायदा होईल, महाविकास आघाडीत फूट होऊन तिसरा गट निर्माण होईल, असे भाकीत केंद्रीय समाज कल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
( The Mahayuti will benefit the most from both Thackerays coming together predicts Ramdas Athawale)
हिंदी सक्ती रद्द करण्याच्या निर्णयाचा जल्लोष करण्यासाठी मुंबईत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या वतीने विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आठवले म्हणाले, आम्ही सुद्धा मराठीप्रेमी आहोत, विजयी मेळावा घेण्याचा त्यांना अधिकार नाही, मुंबईत नॉन मराठी लोक जास्त आहेत. बाहेरून आलेल्या लोकांनी उद्योग धंदे टाकले, मराठी लोकांसोबतच बाहेरच्या लोकांचंही योगदान आहे. लहान मुलांना हिंदी शिकवणे योग्य नव्हते, त्यामुळे मराठी माणसांच्या भावना लक्षात घेऊन हा जीआर रद्द करण्यात आला.
संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना आठवले म्हणाले, खुर्च्या खाली करा हे म्हणण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही. जनता सांगेल, निवडणूक लढा आणि घ्या. राज ठाकरेंना मत भेटत नाहीत, उद्धव ठाकरेंना शिंदेंनी धक्का दिला आहे. चार लोक जाऊन थोबाडीत मारतात, जर असंच असेल तर पाकिस्तानच्या थोबाडीत जाऊन मारा, असं म्हणत यावेळी आठवले यांनी राज ठाकरे यांना देखील डिवचलं आहे.
वंचित बहुजन आघाडीसोबत युतीवर आठवले म्हणाले, मी प्रकाश आंबेडकर यांना साद दिली. मात्र ते ऐक्यसाठी निगेटिव्ह आहेत. बाळासाहेब जर सोबत आले तर माझं केंद्रातलं मंत्रिपद मी त्यांना द्यायला तयार आहे. समाजासाठी एकत्र आले पाहिजे, तर ताकद वाढेल. मी चार पावल मागे यायला तयार आहे.