विशेष प्रतिनिधी
गडचिरोली : राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का यावर राज्यात चर्चा रंगली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारले असता तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे. ही सर्वात मोठी समस्या आहे, असे ते म्हणाले. पण काही हरकत नाही. माध्यमांचं ते कामच आहे, असेही त्यांनी सांगितले. ( The media knows more about Raj-Uddhav coming together than the two of them Devendra Fadnavis said)
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची सध्या चर्चा आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया राज ठाकरे देतील. मी कशी प्रतिक्रिया देणार आह? माझा काय संबंध येतो त्यामध्ये? ते आपआपसात ठरवतील. यांनी साथ द्यायची, त्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे की, त्यांनी द्यायचा नाही आहे.
तुम्हीच जास्त तारे तोडून राहिलात. त्या दोघांपेक्षा जास्त माहिती तुमच्याकडे आहे. ही सर्वात मोठी समस्या आहे, पण काही हरकत नाही. माध्यमांचं ते कामच आहे. पण आता तरी त्यावर प्रतिक्रिया देण्यालायक काही आहे, असं मला वाटत नाही.
तुमच्या राजकीय अनुभवातून काय दिसत? यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी योग्य वेळी सांगतो. तुम्हाला माहिती आहे, मी माझा राजकीय अनुभव असा वारंवार सांगत नसतो. तो उचित वेळी मी सांगत असतो.
राज ठाकरेंसोबतच्या युतीसंदर्भात प्रश्न विचारला असता आज उद्धव ठाकरे म्हणाले की, “जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल.” कारण एकत्र येण्याबाबत जे काही बाकीचे बारकावे आहे, ते आम्ही पाहात आहोत. त्यामुळे संदेश कशाला, मी तुम्हाला बातमीच देईन. कारण माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही आणि जे कोणते नेते आमच्या एकमेकांच्या संपर्कात आहेत, त्यांच्याही मनात संभ्रम नाही. त्यामुळे आम्ही कोणताही संदेश देण्यापेक्षा आम्हाला जी काही बातमी द्यायची आहे, ती आम्ही देऊ.