विशेष प्रतिनिधी
मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येमध्ये सहभागी असलेल्या कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही याबाबत समाज कल्याण मंत्री संजय शिरसाट यांनीच संशय व्यक्त केला आहे. कृष्णा आंधळे याचा खून झाल्याची भीती अनेक दिवसांपासून व्यक्त केली जात आहे. ( The murder of Krishna Andhale?, the accused in the Santosh Deshmukh murder case)
९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुखांची हत्या झाली. तेव्हापासून कृष्णा आंधळे गायब आहे. या प्रकरणातील इतर आरोपी पोलिसांसमोर हजर झाले, मात्र कृष्णा आंधळे शोध घेऊनही सापडलेला नाही. त्यामुळे त्याच्या जिवंत असण्याबद्दल शंका उपस्थित केल्या जात आहे. मंत्री संजय शिरसाट म्हणाले , मला शंका आहे की, कृष्णा आंधळे जिवंत आहे की नाही. कारण ज्या पद्धतीने पोलीस तपास करत आहेत, सगळ्या टीम जाताहेत आणि आतापर्यंत तो भेटत नाही. त्यामुळे शंका व्यक्त करायला वाव आहे. परंतु त्याचा तपास तातडीने लागला पाहिजे. बीड पोलीस अधीक्षकांनी त्यांच्या सर्व टीम पाठवल्या आहेत. महाराष्ट्रातील बाकीच्या टीमही त्याच्या मागावर आहेत. मग तपास न लागण्याचं कारण काय, हे थोडं गुलदस्त्यात आहे. म्हणून मी वारंवार शंका व्यक्त करतोय की, त्याचा खून झाला की काय? अशी शंका मला आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपीचा शोध पोलीस आणि सीआयडीकडून घेतला जात आहे. कृष्णा आंधळेकडे मोबाईल होता. तो त्याने नष्ट केल्याचा दावाही पोलिसांकडून करण्यात आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांनी कृष्णा आंधळेची हत्या करण्यात आली आहे. तो जिवंत नाही , असा दावा केलेला आहे. सुरेश धस यांनीही त्यांच्या जिवंत असण्याबद्दल शंका व्यक्त केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही कृष्णा आंधळे जिवंत नाहीये. त्याची हत्या झालेली आहे , असा आरोप अधिवेशन सुरू झाल्यानंतर केला होता.