विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातील सद्भावना कमी झाली आहे, जाती एकमेकांशी लढत आहेत. प्रत्येक जात वेगळ्या पद्धतीने चालण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आज पुरोगामी महाराष्ट्राची जी ओळख आहे की, आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करावं आणि महाराष्ट्र धर्म जागवावा, असे काम आपण प्रदेशाध्यक्ष म्हणून करणार असल्याचे काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी सांगितले आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर सकपाळ म्हणाले, एकत्रित सर्वांनी पुढे जावं या सद्भावाचा अभाव सध्या आपल्याला बघावा लागतोय. ही सद्भावना घेऊन पुढे जाण्याचा माझा प्रयत्न असेल. काँग्रेसचा वैचारिक आणि संघटनात्मक विस्तार करण्याची आवश्यकता आहे, तो माझा प्रयत्न असेल.
बुथवर चिठ्ठ्या वाटणारा एक कार्यकर्ता पुढे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो, आमदार होतो. राष्ट्रीय स्तरावर काम करण्याची संधी मिळते आणि आता प्रदेशाध्यक्ष पदासारखा सन्मान केला जात असेल तर हा भारावून जाण्यासारखा क्षण आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अत्यंत सामान्य परिवारातील कार्यकर्त्याला हा सन्मान दिला जात असेल तर हे माझं सौभाग्य आहे”.
अखिल भारतीय काँग्रेस समितीने आज एक पत्रक जारी करत सकपाळ यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, “काँग्रेस अध्यक्षांनी हर्षवर्धन सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी तात्काळ प्रभावाने नियुक्ती केली आहे. मावळते अध्यक्ष नाना पटोले यांच्या योगदानाचे पक्ष कौतुक करतो. याचबरोबर काँग्रेस अध्यक्षांनी महाराष्ट्रातील काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून विजय नामदेवराव वडेट्टीवार यांची नियुक्ती तात्काळ प्रभावाने करण्यास मान्यता दिली आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी येण्यास महाराष्ट्रातील कोणीही बडा नेता तयार असल्याने अखेर सकपाळ यांची या पदावर वर्णी लागली आहे