विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: हृदयनाथ मंगेशकर यांनी सावरकरांवरील कविता आकाशवाणीवर सादर करण्याचा प्रयत्न केला म्हणून त्यांना काँग्रेस सरकारने आकाशवाणीतून कायमचे हद्दपार केले, देव आनंद यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला नाही म्हणून त्यांच्या चित्रपटांवर दूरदर्शनवरून घातलेली बंदी असे काँग्रेसच्या दडपशाहीचे अनेक किस्से सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला आरसा दाखविला.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सहाव्या दिवशी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाच्या धन्यवाद प्रस्तावावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत बोलताना काँग्रेसचा काळा इतिहास बाहेर काढला. नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासह काँग्रेसवर टीका केली.
काँग्रेसवर हल्लाबोल करत मोदी म्हणाले की, नेहरूजी पंतप्रधान होते, ते पहिले सरकार होते आणि मुंबईत कामगारांचा संप झाला होता. मजरूह सुलतानपुरी यांनी त्यात एक कविता गायली होती. यासाठी नेहरूजींनी त्यांना तुरुंगात पाठवले. बलराज साहनी यांनी एका मिरवणुकीत भाग घेतला, त्यांनाही तुरुंगात टाकण्यात आले. लता मंगेशकर यांचे भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी ऑल इंडिया रेडिओवर वीर सावरकर यांच्यावर एक कविता प्रसारित करण्याची योजना आखली होती, म्हणून त्यांना आकाशवाणीतून कायमचे हद्दपार करण्यात आले. इतकेच नव्हे तर. जेव्हा देव आनंद यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला नाही म्हणून त्यांच्या चित्रपटांवर दूरदर्शनवरून बंदी घालण्यात आली होती.
प्रसिद्ध सिनेकलाकार देवानंद यांना सांगण्यात आलं की आणीबाणीला पाठिंबा द्या. मात्र देवानंद यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला. त्यामुळे काँग्रेसने दूरदर्शनवर त्यांच्या चित्रपटांना बंदी घालण्यात आली. जे संविधानाबाबत बोलतात त्यांनी संविधान खिशात ठेवलं त्याचाच हा परिणाम आहे. पार्श्वगायक किशोर कुमार यांनी गाणं म्हणण्यास नकार दिला, त्यामुळे आकाशवाणीवर त्यांच्या गाण्यांवर बंदी घातली. हे दिवस देश कधीही विसरु शकत नाही. जे लोकशाहीच्या गोष्टी करतात त्यांनी आणीबाणीच्या काळात जॉर्ज फर्नांडीससह अनेक महान नेत्यांच्या हातात बेड्या घातल्या गेल्या होत्या. देशाचे प्रसिद्ध नेते, त्यांना बेड्या घालण्यात आल्या साखळदंडाने बांधण्यात आलं होतं. आज ते लोक संविधानाबाबत बोलत असतील तर त्यांच्या तोंडी तो शब्द शोभत नाही, अशी टीका पंतप्रधानांनी केली.
सत्तेच्या सुखासाठी आणि शाही कुटुंबाच्या अहंकारासाठी लाखो कुटुंबं त्या काळात देशोधडीला लागली. आपल्या देशाला तुरुंग करण्यात आलं होतं. अत्यंत मोठा संघर्ष झाला, स्वतःला तीस मार खाँ समजणाऱ्यांना नंतर गुडघे टेकावे लागले. भारताच्या नसांनसांत लोकशाही भिनलेली आहे त्यामुळेच असं घडलं असंही पंतप्रधान म्हणाले.
माननीय खरगे अनेकदा शेरोशायरी करतात. आम्हीही त्याची मजा घेतो. एक शेर मीही वाचला होता तो सांगतो, तमाशा करने वालों को क्या खबर? हमने कितने तुफानों को पार कर दिया जलाया है. मल्लिकार्जुन खरगे हे वरिष्ठ नेते आहेत मी त्यांचा सन्मान करतो, असेही ते म्हणाले.