विशेष प्रतिनिधी
भंडारा : कार्यकर्त्यांना झुंजायला लावून सत्तेसाठी विरोधी पक्षाचे नेते मात्र एकत्र येण्याचे उदाहरण भंडारा जिल्ह्यात काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दाखवून दिले आहे. जिल्हा दूध संघाच्या सत्तेच्या मलईसाठी नाना पटोले यांनी शिंदे गटाच्या नेत्याशी हातमिळवणी केली आहे. ( The temptation of power is not gone Nana Patole joins hands with the leader of the Shinde group to benefit the milk union)
भंडारा जिल्ह्यातील दूध संघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि शिंदे गटाचे नेते एकत्र आले आहेत, दूध संघाच्या निवडणुकीसाठी नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत हातमिळवणी केल्यानंतर नाना पटोले म्हणाले की, सहकारमध्ये कुठल्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक होत नाही. त्यामुळे नरेंद्र भोंडेकर हे शिवसेनेचे असले तरी या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही दोघेही मिळून काम करत आहोत. त्यामुळे दूध संघाच्या निवडणुकीला राजकीय वळण देऊ नये. जिल्ह्याच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही निवडणूक आहे. दूध संघाची निवडणूक पार पडल्यानंतर बँकेच्या निवडणुकीसाठी आम्ही पुन्हा एकत्र बसू. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आमचे स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सांगतील त्यानुसार होईल, असेही नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, जे स्वतःला सहकार महर्षी समजतात, अशा भंडारा जिल्ह्यातील सहकार महर्षींनी जिल्ह्याला चौपाट केलं आहे. परंतु जिल्हा दूध संघाला ज्यांनी डबघाईस आणलं त्यांच्याविरोधात ही लढाई आहे. सर्वसामान्य माणूस आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी ही सहकारातील युती आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत.
सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि भाजप आमदार एकत्र आल्याचं पाहायला मिळालं होतं. एकनाथ शिंदेंवर बंडानंतर गद्दार म्हणून टीका करणाऱ्या एकनाथ शिंदेंचे पूर्व विदर्भ समन्वयक व आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यासोबत काँग्रेस नेते व आमदार नाना पटोले यांनी हातमिळवणी केली आहे.