विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुम्ही ज्या ब्रँडचा आणि शिवसेनेचा विषय करता आहेत, ती शिवसेना आणि ब्रँड हा तुमचा आता राहिलेलाच नाही. ब्रँड अजून काही संपायचं बाकी राहिला आहे का? हा ब्रँड त्यावेळीच संपला ज्यावेळेस तुम्ही आम्हाला सोडून काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसला असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. ( The Thackeray brand ended when he sat on the lap of Congress Girish Mahajan told Uddhav Thackeray)
महाजन म्हणाले, बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळी विषय वेगळा होता. त्यांचे विचार वेगळे होते. त्यांची आयडॉलॉजी वेगळी होती. पण तुम्ही तर सत्तेसाठी एका साध्या खुर्चीसाठी काँग्रेसच्या आणि राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसलात, त्यामुळं तो ब्रँड तेव्हा संपला. एवढे पराभव झाल्यावर तुम्ही शिकायला पाहिजे की आपला ब्रँड राहिला कुठे? मार्केटमध्ये काही ब्रँड येतात जातात काही पडद्याआड होतात तसा हा प्रकार आहे.
निवडणुका आल्या की वर्षानुवर्ष हा विषय होतो. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडायचे आहे. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की हे कोणाच्या बापाचा बापाला किंवा पंजोबा आला तरी मुंबई महाराष्ट्रापासून कोणी वेगळे करु शकत नाही. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठी मतांवर डोळा ठेऊन मुद्दाम अशा प्रकारची वक्तव्य ते करत असतात असे म्हणत महाजन यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. या देशात आपण एक आहोत, अनेक भाषा या आपल्या देशात बोलल्या जातात. अनेक धर्माचे लोक आहेत, आपल्याला असं करुन चालणार नाही. संवादाचा सर्वात चांगलं माध्यम आज हिंदी आहे. हे आपल्याला मान्य करावे लागेल असे गिरीश महाजन म्हणाले. पण महाराष्ट्रात निश्चित आपली भाषा मराठी आहेच, मराठीचा आम्हाला अभिमान असल्याचे महाजन म्हणाले. मात्र बाहेर गेल्यावर हिंदीत बोलावं लागेल. निवडणुका आल्या की फक्त हे विषय का निघतात हे मला माहित नाही असे महाजन म्हणाले.