विशेष प्रतिनिधी
मुंबई : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चेला उधाण आले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सूचनेला आता शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंबंधी दोन्ही नेत्यांकडून अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली, तरी शिवसेना (ठाकरे गट) च्या एक्स वरील एका पोस्टने पुन्हा एकदा चर्चांना जोर आला आहे.,( The time has come to come together Shiv Sena Thackeray groups suggestive post)
शिवसेना (उबाठा) अधिकृत एक्स अकाउंटवरून एक पोस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात उद्धव ठाकरेंचा फोटो असून त्यावर लिहिले आहे, “वेळ आलीयं, एकत्र येण्याची… मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे, मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी.” या संदेशामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या युती प्रस्तावाला प्रतिसाद देणार का, याबाबत चर्चेला जोर चढला आहे. पोस्टमध्ये मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी एकजूट होण्याचा निर्धार स्पष्टपणे व्यक्त करण्यात आला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे सध्या परदेश दौऱ्यावर असल्याची माहिती आहे. दोन्ही नेते मुंबईत परतल्यावर युतीच्या शक्यतेवर अंतिम चर्चा व निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी शिवसेना (ठाकरे गट) आणि मनसे युतीबाबत सूचक वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, “आमच्यातील वाद अत्यंत किरकोळ आहेत. महाराष्ट्र फार मोठा आहे आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. मी माझा अहंकार आड येऊ देणार नाही. हा विषय केवळ माझ्या इच्छेवर आधारित नाही; सर्व मराठी लोकांनी एकत्र येऊन एकच पक्ष उभारावा, अशी माझी भावना आहे.”
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर तात्काळ प्रतिक्रिया देताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, “महाराष्ट्राच्या हितासाठी मी एकत्र येण्यास तयार आहे. मी किरकोळ मुद्दे बाजूला ठेवले आहेत. माझ्या बाजूने कोणतेही मतभेद नाहीत.”