विशेष प्रतिनिधी
मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी 23 जानेवारीला मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाचे दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा, असा टोला शिवसेना शिंदे गटाचे
नेते राहुल शेवाळे यांनी लगावला आहे .
राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे असा दावा शिवसेनेचे नेते राहुल शेवाळे यांनी केला आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मंत्री उदय सामंत यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राहुल शेवाळे म्हणाले, 23 जानेवारीला एक मोठा स्फोट होण्याची शक्यता आहे. राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. म्हणून आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याकरता, आपल्या आमदारांना टिकवण्याकरता अशा बातम्या विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत पसरवत आहेत. काँग्रेसचे काही आमदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे काही आमदार हे शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यासाठी इच्छूक आहेत. दहा ते पंधरा आमदार शिवसेनेत प्रवेश करू शकतात, आणि त्यामुळे कुठे न कुठे तरी आपला पक्ष फुटू शकतो, अशी भीती आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षाच्या उदयापेक्षा स्वत:च्या पक्षाच्या अस्ताची चिंता करा..shivsena ubt
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीपूर्वीच शिंदे गटात मोठी फूट पडणार होती. उदय सामंत हे शिंदे गटापासून वेगळं होणार होते. त्यांच्यासोबत वीस आमदार होते. राज्यात महायुतीचं सरकार आलं, मात्र एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदासाठी अडून बसले होते. एकनाथ शिंदे यांच्याशिवाय सरकार बनवण्याचा भाजपचा प्लॅन होता असा खळबळजनक दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेलं असतानाच आता त्यानंतर राहुल शेवाळे यांनी देखील राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना जोरदार टोला लगावला आहे.