विशेष प्रतिनिधी
मुंबई : पुण्यात रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक झाली आहे. भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षा आणि विधानपरिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या प्रकरणावरून रोहिणी खडसे आणि सुप्रिया सुळे यांना लक्ष्य केले आहे. ( There is darkness under your lampChitra Wagh targets Supriya Sule Rohini Khadse in the rave party case)
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर सातत्याने टीका करत होते, तर रोहिणी खडसेही विविध मुद्द्यांवरून महायुती सरकारवर जोरदार हल्ला चढवताना दिसत होत्या. मात्र, आता प्रांजल खेवलकर यांच्या अटकेने त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. चित्रा वाघ यांनी यावरून सुप्रिया सुळे यांना सवाल केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ओऽऽऽऽऽ१२मतीच्या मोठ्ठया ताई. तुमच्या तर दिव्याखालीचं अंधार होऽऽऽ
तुमच्या वाजंत्रीताई. महाराष्ट्रात ड्रग्स येतात कुठून हा प्रश्न सरकारला विचारतात. त्याआधी त्यांनी स्वत:च्या नवऱ्याला प्रांजल खेवलकरना हा प्रश्न विचारायला हवा…महाराष्ट्रातल्या प्रत्येक घटनेत सरकारला जबाबदार धरणाऱ्या आमच्या नावाने कायम तुतारी वाजवणाऱ्या वाजंत्री ताईंनी आधी स्वत:च्या घराकडे लक्ष द्यावे. आणि हो…..तुमचा नवरा लहान नाही कि त्याला कोणी उचलून आणून रेव्हपार्टीत बसवेल नाही तर यात ही पुन्हा सरकारलाच जबाबदार धराल…
राज्यात जेव्हापासून देवाभाऊंचे भाजपा-महायुतीचे सरकार आलयं तेव्हापासून ड्रग्सची प्रकरणे बाहेर येत आहेत.
आधी ती बेमालूमपणे का लपवली जायची कोण लपवायचे याचे गूढ इथेच कुठेतरी दडलं आहे असं की काय असा प्रश्न महाराष्ट्राला पडतोय आणि गुन्हे उघड झाल्यावर वाजंत्रीताई चोराच्या उलट्या बोंबा मारायला पुढे येतात हेही गुपित उघड झालं…
पुण्यातील खराडी परिसरातील एका उच्चभ्रू वसाहतीतील फ्लॅटमध्ये शनिवारी (२६ जुलै) रात्री उशिरा सुरू असलेली रेव्ह पार्टी पुणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उधळून लावली. या कारवाईत चार पुरुष आणि दोन महिलांना अटक करण्यात आली असून, अटक झालेल्यांमध्ये माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. ही घटना समोर आल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, याप्रकरणी राजकीय घडामोडी अधिकच गडद होण्याची शक्यता आहे.