विशेष प्रतिनिधी
पुणे : तलाठ्यापासून मंत्रालयातून राज्याचा कारभार चालवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत आपण ‘एक परिवार’ आहोत हे ध्यानात ठेवून न घाबरता जनतेची कामे करावी. अनवधानाने झालेली चूक माफ करता येते, जनतेच्या विश्वासाला तडा जाईल अशी चूक जाणीवपूर्वक झाली तर माफी नाही, हेही लक्षात असू द्या, असा कानमंत्र महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील सर्व वरिष्ठ महसूल अधिकाऱ्यांना दिला. ( There is no forgiveness for a mistake that breaks faith Chandrasekhar Bawankules warning to senior officials)
पुणे येथे दोन दिवस महसूल परिषद होत आहे. या परिषदेच्या उद्घाटन करताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकसित महाराष्ट्राची रूपरेषा आखली आहे. ती पूर्णत्वास नेण्यासाठी पडेल ते कष्ट करा. महसूल विभागाला प्रशासनाचा कणा म्हणतात. त्यामुळे लोककल्याणकारी योजना राबविताना समाजाच्या शेवटच्या माणसाची काळजी घ्या. त्याचा कणा ताठ राहिला पाहिजे यासाठी जिवाचे रान करा. राज्याचा कारभार पारदर्शी आणि गतिमान करण्याचे काम महसूल विभागच करू शकतो, हा विश्वास मला आहे.
कार्यशाळेस अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, कोकण विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिद्री, अमरावती विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांच्यासह सर्व जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.
पुढील दोन वर्षात एकाही व्यक्तीची सुनावणी बाकी राहता कामा नये असा संकल्प करून महसूल विभागाचा देशात आदर्श निर्माण करावा. शेतकऱ्यांच्या आत्महत्या अतिशय दुर्दैवी आहेत.. आपण त्या थांबल्या पाहिजेत यासाठी काम करण्याची गरज आहे. शेतीला पाणी, पाणंद रस्ते, वीज देण्यासाठी पुढाकार घेऊन शेतकऱ्याला सुखी करण्याचे प्रयत्न होऊ द्या.आम्ही लोकप्रतिनिधी आहोत. जनतेला आम्ही उत्तरदायी आहोत. जनतेने दिलेली मतं ही आम्ही कर्ज समजतो. त्यासाठी जनतेला उत्तरदायी राहणे हे आमचं कर्तव्य आहे. महसूल विभागाने लोकाभिमुख निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. कामात आधुनिकीकरण आणि ए आयचा वापर झाला तर महसूल विभाग अधिक चांगले काम करत आहे हे लक्षात येईल. कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी कायम तुमच्या पाठीशी आहे. आपण मिळालेली जबाबदारी ही केवळ जबाबदारी न समजता नाविन्यपूर्ण काम केले पाहिजे. आपल्या काळात एखादे तरी काम चांगले जनतेच्या हिताचे झाले पाहिजे असा उद्देश ठेवा. अनेक किचकट कायदे सोपे केले पाहिजेत, कायदा करताना विधिमंडळातही महसूल विभागावर विश्वास दाखवला जातो.
आपण नव्याने काही योजना आणत आहोत यामध्ये वाळू धोरण, देवस्थान जमिनी, भोगवटा दोनच्या जमिनी एक करणे, स्वामित्व योजना, पाणंद रस्ते अशा पद्धतीची कामे केली जाणार आहेत. यासाठी ही कामे करताना अधिकाऱ्यांनी आपली मानसिकता बदलली पाहिजे. सकारात्मक राहा व जनतेची कामे करा. कोणावरही निलंबन , अभियोगाची कारवाई करताना मंत्री म्हणून आनंद होत नाही ; मात्र खूप चुकीच्या पद्धतीने काम केले तर त्याच्यावर कारवाई होणार असा इशाराही त्यांनी दिला.
माध्यमे लोकांसाठी असतात , जनतेचे प्रश्न ते मांडतात. आपल्या विभागातील लोकाभिमुख निर्णयाच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या पाहिजेत. माध्यमांना घाबरू नका. आपले चांगलं काम त्यांच्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी महिन्यातून किमान एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे. अनेक ठिकाणी प्रवास करून वेगवेगळे अनुभव आणि चांगलं काम माध्यमांसमोर मांडा. सकारात्मक बातम्या समाजाची गरज आहे. माध्यमे सकारात्मकता नक्कीच वाढवितात. प्रवास आणि संवाद हीच आपल्या यशाची पुढची पावले आहेत. इतर राज्यांमध्ये काय चालले आहे याचा देखील अभ्यास करावा
महसूल विभागातील लोक हे इतर शासकीय विभागांमध्ये जाण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे. त्यामुळे महसुल विभागातील कामकाजावर अधिक ताण पडतो. यापुढे असे होणार नाही. इतर ठिकाणी पाठवलेल्या लोकांना पुन्हा महसूल विभागामध्ये आणण्याचे काम पुढील काळामध्ये होऊन आस्थापना अधिक सशक्त केली जाईल असे सांगून बावनकुळे म्हणाले की, अधिकाऱ्यांनी चुकीचे काम अजिबात करू नये. अगदी मंत्र्यांनी जरी सांगितले आणि नियमात बसत नसेल तर स्पष्टपणे मत नोंदवा, अशा सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
कार्यक्रमावेळी भूमी अभिलेख बोधचिन्हाचे उद्घाटन करण्यात आले. त्याबरोबरच इप्सित, तीस भू प्रणाम केंद्र, ई मोजणी वर्जन टू आणि महा खनिज ऑटो या प्रकल्पांचेही उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अप्पर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी केले तर पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आभार मानले.