विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत केलेल्या सूचक विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “मनसेसोबतच्या युतीबाबत मी संदेश देणार नाही, थेट बातमीच देईन,” असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केले असून त्यामुळे राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्यात हालचाली सुरू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
( There is no messageregarding alliance with MNS I will give direct news Uddhav Thackerays statement sparks discussions)
नगरसेविका सुजाता शिंगाडे यांच्या शिवसेनेत पुनर्प्रवेशाच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ‘राज ठाकरे – उद्धव ठाकरे एकत्र येणार का?’ या प्रश्नावर उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे, ते होईल. आम्ही आतून बारकावे पाहतो आहोत, त्यामुळे मी कुठलाही ‘संदेश’ देणार नाही. वेळ आली, की थेट बातमीच देईन.”
या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्टपणे म्हटले की, “उद्धव ठाकरे यांनी एक फोन केला, तरी राज ठाकरे शंभर पावले पुढे येतील.”
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीदेखील यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संवादाबाबत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे. नेते सकारात्मक आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांचेही मनोबल वाढले आहे. हे दोघे भाव सोशल मीडियावर जाहीर न करता प्रत्यक्ष फोनवरच एकमेकांशी संवाद साधतील, हेही शक्य आहे. कदाचित आधीच संवाद झाला असेल!”
या सर्व घडामोडींमुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती होण्याची शक्यता वाढली आहे. सत्ताधारी भाजप-शिंदे गटाच्या वाढत्या प्रभावास टक्कर देण्यासाठी ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याची गरज कार्यकर्त्यांच्या पातळीवर जाणवते आहे.
दोन दशकांनंतर हे दोन भाऊ आणि दोन पक्ष एकत्र येण्याचा मार्ग खुला होतोय का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.