विशेष प्रतिनिधी
पंढरपूर : महाराष्ट्रामध्ये सर्व नेते वैचारिक विरोधक असतील मात्र, ते शत्रू नाहीत. त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जन्मदिनाच्या दिवशी, एखाद्याच्या अभीष्टचिंतन प्रसंगी एखाद्याने चांगली भावना व्यक्त करणे, याचा अन्यथा अर्थ काढणे अतिशय अयोग्य असल्याचे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. (There may be ideological opponents but they are not enemies the Chief Minister told those who misinterpreted Pawar Thackerays wishes)
देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय प्रामाणिक व हुशार राजकारणी आहेत. भविष्यात त्यांना केंद्रात मोठी जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणात आलेल्या आव्हानांवर आपल्या अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने मात करून त्यांनी आपली विश्वासार्हता वाढविली आहे, अशी स्तुतिसुमने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उधळली आहेत. फडणवीस यांच्या कार्याचा झपाटा आणि कामाचा उरक मोठा आहे. ते थकत कसे नाहीत, असा प्रश्न मला पडतो, अशा शब्दांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांचा गौरव केला आहे. यवतर मुख्यमंत्री म्हणाले, याचा राजकीय अर्थ काढण्याचा प्रयत्न अयोग्य असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, याचा चूकीचा अर्थ काढून महाराष्ट्रामध्ये एका चुकीच्या संस्कृतीला आपण पुढे करतो आहोत का असा याचा अन्यथा अर्थ निघेल. त्यामुळेच याला याच परिप्रेक्षात पाहायला हवे. जन्मदिवसाच्या निमित्ताने काही लोकांनी एक पुस्तक प्रकाशित केले, त्यांनी ज्या महाराष्ट्रातील प्रमुख दोनही नेत्यांना प्रतिक्रिया मागितली त्यांनी ती प्रतिक्रिया दिली. त्यांची भावना त्यांनी व्यक्त केली आणि शुभेच्छा दिल्या. याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मात्र याचा अन्य अर्थ काढणे खूपच संकुचित ठरेल .
मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्यात सुरू असलेल्या मराठी – अमराठी वादावर भाष्य करताना उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्र म्हणाले, राज्यपाल हे संवैधानिक पदावर आहेत. ते जे योग्य आहे तेच बोलतात. त्यांना राजकीय वादात ओढणे योग्य नाही.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामा संदर्भात देखील त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मात्र मी संतांच्या भूमित आलो आहे. संतांचे कार्य मोठे आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही राजकीय प्रश्नाला उत्तर देणार नसल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, आपल्याला कोणाचाही विनाश करून विकास करायचा नाही. तर सर्वांना सोबत घेऊन, सर्वांना समाविष्ट करून आपल्याला विकास करायचा आहे. ज्यांच्या दुकानांवर किंवा घरांवर पंढरपूर विकास कॉरिडोर मुळे कारवाई करावी लागेल, त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने समाविष्ट करून घेण्यात येईल. कोणाचेही नुकसान होणार नाही, अशा प्रकारचा कॉरिडोर तयार करण्यात येणार आहे. मात्र या ठिकाणी कोट्यावधी लोक येतात आणि त्यांची अव्यवस्था होते, हे योग्य नाही. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन येथील विकास होणार आहे.
कॉरिडोरचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर सर्वांना विश्वासात घेतले जाईल. आतापर्यंत देखील काही लपवण्यात आलेले नाही. सर्वांशी सरकारच्या अधिकाऱ्याने चर्चा केली आहे. सर्वांना प्रश्नावली दिली आहे. सर्वांची माहिती घेण्यात आली आहे. कुठेही लपून छपून काम चाललेले नाही. सर्व काम उघड होणार आहे. पंढरपूर विकास आराखडा म्हणजेच चोरी नाही, तर सर्व लोकांना सोबत घेऊन आपल्या श्री विठ्ठलाचे मंदिर आणि परिसराचा विकास करणे हे याच ध्येय आहे. या संदर्भात राजकीय पुढाऱ्यांना भेटण्यापेक्षा जे लोक बाधित आहेत, त्यांना भेटण्यासाठी आपण कधीही तयार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.