विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या मेळाव्यात बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शिंदे गटाचा गद्दार असा उल्लेख केला होता. उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, गद्दारांसमोर उभा राहून मी म्हणतोय की, कम ऑन किल मी. उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्याची शिवसेना शिंदे गटाने व्यंगचित्राच्या माध्यमातून खिल्ली उडवली आहे. ( There was constant struggle while walking two steps gossip about heritage and idle chatterShinde group mocked Uddhav Thackeray through a cartoon)
उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याप्रकरणी शिंदे गटाने व्यंगचित्र रेखाटत मार्मिक भाष्य केले आहे. दोन पावलं चालताना होते सतत धडपड, वारशाच्या गप्पा आणि फुकाची बडबड, असे म्हणत शिवसेनेने उद्धव ठाकरेंचे एक व्यंगचित्र असलेला फोटो ट्वीट केला आहे. या व्यंगचित्रात उद्धव ठाकरेंच्या एका हातात शरद पवारांची कुबडी दाखवून त्यांचे पाय लटपटत असल्याचे दाखवले आहे. तर, हिरव्या रंगाच्या काँग्रेसरुपी सिलेंडरने ते श्वास घेत असल्याचे दाखवण्यात आले आहे. या व्यंगचित्राच्या खाली काँग्रेसच्या विचारांचा श्वास घेऊन आणि शरद पवारांच्या पाठबळावर उभे राहणारे उद्धव ठाकरे असा मजकूर आहे.
वरळी येथील एन.एस.सी.आय. डोम येथे गुरुवारी झालेल्या शिवसेना शिंदे गट वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, उद्धव ठाकरे यांनी भाषणात म्हटले की, कमॉन कील मी. मला वाटतं ते इंग्लिश पिक्चर बघून आले असतील. परंतु मी त्यांना सांगू इच्छितो की, मेलेल्या माणसाला काय मारणार? कारण महाराष्ट्राच्या जनतेनं विधानसभेच्या निवडणुकीत तुमचा मुडदा पाडलेला आहे. वाघाच कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचा काळीज आणि मनगटात जोर लागतो. तो दम शिवसैनिकात आहे. त्यामुळे आमच्या नादाला तुम्ही लागू नका. तुमचा टांगा पलटी घोडं फरार आम्ही केलं आहे. बाळासाहेबांचा आणि आनंद दिघेंचा सच्चा कार्यकर्ता मी आहे, असेही एकनाथ शिंदे म्हणाले होते.