विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताला खेळणी उद्योगात जगात अग्रस्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. मेड इन इंडिया ब्रँडच्या नावाने जगभरात टिकाऊ खेळण्यांच्या उत्पादनात भारताला नाव मिळवून देण्यासाठी काम केलं जाईल, अशी घोषणा केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण यांनी केली.
मोदी सरकारच्या तिसऱ्या काळातील अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी सादर केला. यामध्ये त्यांनी विविध घोषणा केल्या आहेत. भारतीय भाषा पुस्तक योजनेतुन शाळा व उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील. यातून विद्यार्थ्यांना त्यांचे विषय त्यांच्या भाषेत समजून घेणं सोपं जाईल. सक्षम अंगणवाडी पोषण कार्यक्रमत ८ कोटींहून अधिक मुलांना पोषक आहार पुरवला जाणार. यासाठीचा खर्च वेळ येईल तसा वाढवला जाईल.
अटल टिंकरिंग लॅब या ५० लाख लॅब पुढच्या पाच वर्षांत सरकारी शाळांमध्ये उभ्या केल्या जातील. सर्व सरकारी माध्यमिक शाळा व प्रायमरी आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवली जाईल.
मागास वर्गातील महिलांसाठी नवी योजना राबवण्यात येईल. त्यातून ५ लाख महिलांना लाभ मिळू शकेल. या महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं जाईल. देशात ५. ७ कोटी लघुउद्योग असून त्यातून ७.५ कोटी लोकांना रोजगार मिळत आहे. लघु उद्योगांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. बिहारमध्ये मखाणा उत्पादनावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी विशेष मखाणा बोर्डाची स्थापना केली जाणार आहे. भारताचा मत्स्य उत्पादनात जगभरात दुसरा क्रमांक लागतो. त्यात शाश्वत उत्पादन प्रक्रिया राबवण्यासाठी काम केलं जाईल. अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरावर लक्ष केंद्रीत केलं जाईल.तूर, उडीद आणि मसूर डाळींच्या उत्पादनासंदर्भात विशेष लक्ष दिलं जाणार. नाफेड, एनसीसीएफकडून डाळींची खरेदी केली जाणार आहे.
२३ आयआयटींमधील विद्यार्थी क्षमता ६५ हजाराहून १.३५ लाखांपर्यंत गेल्या १० वर्षांत वाढली आहे. ही वाढ १०० टक्के इतकी आहे. २०१४ नंतर सुरू झालेल्या पाच आयआयटींमध्ये अतिरिक्त सोयी-सुविधा उभारल्या जाणार आहेत. पाटणा आयआयटीमधील हॉस्टेल सुविधाही वाढवल्या जातील अशी घोषणा निर्मला सीतारमण यांनी केली.