विशेष प्रतिनिधी
बीड : “हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे, मराठी आपली मातृभाषा आहे आणि इंग्रजी ही जागतिक संवादाची भाषा आहे. या तिन्ही भाषा आपल्या दैनंदिन जीवनात अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे हिंदीला विरोध करण्याचं काहीच कारण नाही. ज्यांच्याकडे दुसरा काही उद्योग नाही, तेच हिंदी विरोधाचं राजकारण करत आहेत,” असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरे यांना लगावला. ( They do antiHindi politicsthey have no other business Ajit Pawar hits out at Raj Thackeray)
अजित पवार बीड येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, इंग्रजी ही जागतिक भाषा आहे. तीन्ही भाषा आपल्या साठी महत्वाच्या आहेत. त्यामुळें हिंदीला विरोध करण्याचे काही कारण नाही, कारण मराठी आपली मातृभाषा आहे. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने मराठी अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, त्यामुळे ज्यांच्याकडे काही उद्योग नाही ते हिंदी भाषेला विरोध करत आहेत.
पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोध केला आहे. हिंदी भाषा लादल्यास संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल असा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी हा टोला मारला.
यावेळी त्यांनी नाशिकमधील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पोलिस कारवाईबाबतही स्पष्ट भूमिका मांडली. “नाशिक दंगल प्रकरणात कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्यावर लक्ष केंद्रित न करता, जे खरोखरच दोषी आहेत त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जात आहे. कुणालाही वाचवले जाणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
निलंबित PSI अभिजीत कासले यांनी केलेल्या आरोपांबाबत अजित पवार म्हणाले, “या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल आणि चौकशीच्या निष्कर्षानुसारच योग्य ती कारवाई केली जाईल.”
त्याचबरोबर, बीडमध्ये एका महिलेला अमानुषपणे मारहाण करण्यात आल्याची घटना उघड झाल्यानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. “त्या महिलेचे फोटो मला काल रात्री उशिरा प्राप्त झाले. जे दोषी असतील त्यांच्यावर कायद्यानुसार कडक कारवाई केली जाईल,” असंही ते म्हणाले.