पुणे : यंदाचे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात होणार आहे. हा प्रतिष्ठेचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांना मिळाला आहे. पुण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला आहे.
( This years 99th Akhil Bhartit Marathi Sahity Samelan will be held in Satara.)
अखिल भारतीय मराठी साहित्य एकमताने घेण्यात आलेला निर्णय अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी जाहीर केला आहे. साताऱ्याला ३२ वर्षांनंतर मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे. यापूर्वी 1993 सालामध्ये साहित्यिक विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६वे संमेलन येथे पार पडले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा गेली बारा वर्षे संमेलनासाठी साताऱ्याच्या निवडीसाठी प्रयत्नशील होती.
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी स्थळ निवड समितीने पाच ते सात जूनदरम्यान साताऱ्यासह औदुंबर, इचलकरंजी आणि कोल्हापूरमधील संस्थांच्या प्रस्तावित स्थळांना भेटी दिल्या. हे संमेलन साताऱ्यातील छत्रपती शाहू स्टेडियमवर आयोजित करण्यात येणार आहे. याच ठिकाणी यापूर्वी १९९३ सालीही संमेलन झाले होते. १४ एकरांच्या स्टेडियममध्ये मुख्य मंडप, दोन उपमंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी-गझल कट्टा, आणि भोजन व्यवस्था असे विविध विभाग असतील. २५,००० प्रेक्षक क्षमतेची गॅलरी, तसेच जवळच पोलिस परेड ग्राउंडची ८ एकर पार्किंग सुविधा यामुळे साहित्यरसिकांसाठी संमेलन अनुभवण्याची योग्य व्यवस्था असेल.
साताऱ्यातील हे चौथे साहित्य संमेलन ठरणार आहे. यापूर्वी १९०५ मध्ये रघुनाथ पांडुरंग करंदीकर, १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ आणि १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली संमेलने पार पडली होती. संमेलनाच्या नियोजनासाठी मार्गदर्शन समितीही स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये प्रा. मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे.