विशेष प्रतिनिधी
मुंबई : काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली आहे. ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, ज्यांनी विचार सोडले त्यांचं हे असंच होणार आहे. विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. (Thoughts ahead and helplessness behind Eknath Shindes attack saying Congress showed place to Uddhav Thackeray)
इंडिया आघाडीच्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना शेवटच्या रांगेत बसविण्यात आले. त्याचे फोटोही समोर आले आहेत. यावर शिंदे म्हणाले, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली आहे. त्यांना या गोष्टीचं काहीच वाटत नसेल तर मी यावर काय प्रतिक्रिया देणार. हे उलट तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की तुम्हाला इतक्या मागे का बसवलं होतं?
आम्ही बाळासाहेबांचा आणि हिंदुत्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहे. विकासाचा विचार पुढे घेऊन चाललो आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदेंना काही देशांचा दौरा करणाऱ्या डेलीगेशनचा हेड बनवला आहे. त्यामुळे मोदींना कोणाचा सन्मान करायचा, कोणाला मान द्यायचा हे त्यांना माहिती आहे. यात बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन चाललोय हा त्या विचाराचा सन्मान आहे.
दरम्यान, इंडिया आघाडीच्या झालेल्या बैठकीत राहुल गांधी मतांची हेराफेरी यावर बोलले. या बैठकीतील एक फोटो व्हायरल झाला असून त्यामध्ये उद्धव टाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे खूप मागे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत होते. हाच मुद्दा उचलून धरत शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी ठाकरेंवर टीका करत ट्विट वॉर सुरू केलं. त्यांनी या फोटोवरून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर हल्ला केला.
खासदार नरेश म्हस्के यांनीही अरे अरे काय ही तुमची किंमत असे म्हणत शिवरायांचा वारसा सांगता मग काँग्रेसच्या बैठकीत सर्वात शेवटच्या रांगेत कसे बसलात असा सवाल त्यांनी केला आहे.
इंडी आघाडीत उद्धटराव, विश्वप्रवक्ते ,पेंग्विनची ही जागा … आता काही बोललं तर बोलणार की लायकी काढतात म्हणून…” अशी टीका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी केली.