पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तीन वरिष्ठ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडले आहेत. कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिले अदा करण्यासाठी लाच स्विकारताना या तिघांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या तिघांना अटक करण्यात आली आहे. एकाच कामासाठी तिघा अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केली.
( Three senior officials of Pune Zilla Parishad caught in the anti-corruption net, arrested while taking bribe from a contractor)
अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये
कार्यकारी अभियंता (दक्षिण विभाग) बाबुराव कृष्णा पवार (वय ५७ वर्षे), उपअभियंता दत्तात्रेय भगवानराव पठारे (वय ५७ वर्षे) आणि कनिष्ठ अभियंता अंजली प्रमोद बगाडे यांचा समावेश आहे. ‘लाचलुचपत’च्या पुणे विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहायक पोलिस आयुक्त दयानंद गावडे यांनी सांगितले.
याप्रकरणी एका ५७ वर्षीय कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
तक्रारदाराने जिल्हा परिषदेकडून निविदा प्रक्रियेतून मिळालेली विकासकामे पूर्ण केली होती. या पूर्ण केलेल्या कामांची देयके जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाकडे प्रलंबित होती. ही रक्कम हवी असेल तर, अदा करावयाच्या एकूण रकमेच्या २ टक्के रक्कम लाच म्हणून द्यावी लागेल, अशी मागणी करण्यात आली.
तक्रारदाराने यासंदर्भात १० मार्च २०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर ११ मार्च २०२५ रोजी पंचासमक्ष लाच मागणीची पडताळणी करण्यात आली. या दरम्यान, तिघा अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हा परिषद कार्यालयात सापळा रचला. तक्रारदाराकडून घेतलेले ₹६४,००० स्वीकारताना बाबुराव पवार यांना रंगेहात पकडले. त्याचप्रमाणे अंजली बगाडे यांनी स्वतः मागितलेले १४,०००० दत्तात्रेय पठारे यांच्याकडे सुपूर्त करण्यास सांगितले. त्या दोघांनाही लाच घेताना पकडण्यात आले.
कारवाईदरम्यान बाबुराव पवार यांच्या कार्यालयातील एका बॅगेत ८,५८,४०० रुपयांची रोख रक्कम आढळून आली, जी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जप्त केली आहे. या तिघांविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार हे ठेकेदार असून त्यांनी दौंड तालुक्यातील खुटबाव रोड ते गलांडवाडी पांदन शिव रस्ता आणि गलांडवाडी मंदिर ते ज्ञानदेव कदम घर रस्ता या कामांची वर्कऑर्डर मिळवली होती. या दोन्ही कामांची रक्कम ₹४० लाख होती.
या प्रकरणाचा तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक कल्पेश जाधव हे करत आहेत. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, व अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ .शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केल्याचे पोलीस निरीक्षक रुपेश जाधव यांनी सांगितले.