विशेष प्रतिनिधी
मुंबई : शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी विश्वासार्ह बियाणे सारथी पोर्टलवर आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यस्तरीय खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. ( Trusted seeds will be brought to the Sarathi portal informed Chief Minister Devendra Fadnavis)
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात यावेळी आवश्यक तेवढा बियाणांचा पुरवठा आहे. तसेच आवश्यक खत आहे. यात कुठलाही तुटवडा निर्माण होणार नाही. वारंवार बोगस बियाणांचे प्रकार बाहेर येतात. त्यामुळे महाराष्ट्राने यावेळी वेगळा प्रयोग केला आहे. केंद्र सरकारचे सारथी हे एक पोर्टल आहे. या पोर्टलवर बियाण्याचं रजिस्ट्रेशन करावे लागते . हे रजिस्ट्रेशन स्ट्रेसेबल असतं. या बियाण्याचं उत्पादन कुठं झालं हे आपल्याला पाहता येते . आम्ही केंद्र सरकारला विश्वासार्ह बियाण्याची या पोर्टलवर नोंदणी करावी अशी विनंती केली आहे. ही विनंती आता मान्य करण्यात आली आहे.
फडणवीस म्हणाले, खरीप हंगामाच्या अनुषंगाने हवामान खात्याने सुरूवातीला आम्हाला माहिती दिली. यावेळी सरासरीपेक्षा जास्त पाऊस असेल असा त्यांचा अंदाज आहे. सरासरीपेक्षा 7 टक्क्यांपासून 17 टक्क्यांपर्यंत महाराष्ट्रातील विविध विभागांमध्ये त्यांनी पाऊस सांगितलेला आहे. पावसाचा खंड फार असणार नाही, असा देखील अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पावसाचा तसेच हवामानाचा आमचा दीर्घकालीन अंदाज बरोबर येतो. परंतू कमी काळाचा हवामानाचा अंदाज यामध्ये काही बदल होऊ शकतो, असं हवामान विभागाने सांगितले आहे. एकूणच राज्यात या वर्षी योग्य पाऊस पडेल, अशी अपेक्षा आहे.