विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्याचा वाद आता थेट आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यात आला आहे. स्वतःला मुघल सम्राट बहादूर शाह झफर यांचा वंशज म्हणवणाऱ्या याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी थेट संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेस यांना पत्र लिहून या मुद्द्यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मात्र, भारताच्या अंतर्गत प्रकरणावर परकी संस्थेकडून न्याय मागणे ही अत्यंत निषेधार्ह आणि निंदनीय बाब आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहे. (. Tusis Appeal to UN Over Aurangzebs Tomb Sparks Outrage Taking Indias Internal Matter to Global Stage Condemned)
याकूब तुसी यांनी आपल्या पत्रात औरंगजेबाच्या थडग्याला आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार संरक्षण मिळावे, अशी विनंती केली आहे. परंतु भारतातील कायदे, संविधान आणि न्यायप्रणाली सक्षम असताना, देशातल्या प्रकरणात परदेशी हस्तक्षेप मागणे हे भारताच्या सार्वभौमत्वावर घाला घालण्यासारखे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
मोगल साम्राज्याचा शेवटचा बादशाह असलेल्या बहादूर शाह जफर यांचा वंशज असल्याचा दावा करत याकूब हबीबुद्दीन तुसी यांनी या प्रकरणी थेट संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांना एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या थडग्याला सुरक्षा देण्याची मागणी केली आहे.
नागपूरमध्ये 17 मार्च रोजी झालेल्या रॅलीदरम्यान थडग्याच्या मुद्यावरून दोन समाजांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यानंतर तुसी यांनी या प्रकरणाला धार्मिक रंग देत, थेट युनेस्को आणि संयुक्त राष्ट्र यांच्याकडे दाद मागितली. ही कृती केवळ संवेदनशीलतेचा वापर करून जनभावना भडकवण्याचा प्रयत्न आहे, असे अनेकांकडून म्हटले जात आहे.
इतिहासाचे विकृतीकरण, चित्रपटांवर टीका आणि थडग्याच्या सुरक्षेची आंतरराष्ट्रीय मागणी करून तुसी यांनी भारताच्या अंतर्गत सुरक्षेवर आणि पुरातत्त्व खात्यावर अविश्वास दाखवला आहे. देशात असे मुद्दे न्यायव्यवस्थेत मार्गी लावले जाऊ शकतात, त्यासाठी परकी हस्तक्षेपाची गरज नाही.
देशातील घटनेने प्रत्येक स्मारक, धर्म, समाज यांचे रक्षण करण्याची स्पष्ट हमी दिली आहे. त्यामुळे याकूब तुसी यांची ही भूमिका केवळ राजकीय हेतूने प्रेरित असून, देशाच्या स्वाभिमानाला धक्का देणारी आहे, असा सूर अनेक नागरिकांनी आणि तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
औरंगजेबाचे हे थडगे हटवण्याची मागणी करत काही दिवसांपूर्वी नागपूरमधील एका रॅलीमध्ये दोन समुदायांमध्ये हिंसाचार झाला होता.
औरंगजेबाच्या कबरीच्या म्हणजे वक्फ संपत्तीचा ट्रस्टी असल्याचे सांगत याकूब तुसी म्हणतात, ही कबर म्हणजे एक राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे स्मारक आहे. आणि याला पुरातत्त्व विभागाच्या 1958 च्या अधिनियमांतर्गत संरक्षित करण्यात आले आहे. याचाच उल्लेख त्यांनी या पत्रात केला आहे. पुरातत्त्व विभागाच्या नियमांनुसार, संरक्षित स्मारकाच्या आसपास कोणतेही अनधिकृत बांधकाम, आहे त्या परिस्थितीत काही बदल, संरक्षित स्मारकाचे उत्खनन किंवा त्याचा विनाश केला जाऊ शकत नाही. असे करायचा कोणीही प्रयत्न केल्यास ते बेकायदेशीर मानले जाईल आणि कायद्याच्या दृष्टीने ते दंडनीय असेल, असे तुसी यांनी पत्रात म्हटले आहे.
औरंगजेबाचं थडगं उखडण्याच्या मागणीवरून 17 मार्च रोजी नागपूरमधील एका रॅलीत दोन समाजांमध्ये हिंसाचार भडकला होता. यात काही समाजांनी हे थडगं हटवण्याची मागणी केली. त्यावरून दुसऱ्या धर्माच्या धार्मिक गोष्टींचे नुकसान झाल्याच्या अफवा पसरल्या आणि मग थेट पोलिसांवरच दगडफेक झाली. यानंतर आतापर्यंत जवळपास 92 जणांना अटक केली.
याकूब तुसीने आपल्या पत्रात संयुक्त राष्ट्र महासचिवांनी या प्रकरणाची दखल घेण्याचे आवाहन केले आहे. यासोबतच औरंगजेबाच्या थडग्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार संपूर्ण कायदेशीर संरक्षण आणि सुरक्षा दिली जावी. तसे आदेश भारत सरकार आणि पुरातत्त्व खात्याला आदेश देण्याची मागणी केली. यासोबतच भारताने युनेस्कोच्या विश्व सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा संरक्षण करार, 1972 मान्य केला आहे. त्यामुळे अशा स्मारकांचा नाश करणे हे आंतरराष्ट्रीय कराराचे उल्लंघन ठरेल असेही तुसी म्हणाले.
त्यांनी छावा चित्रपटाचे नाव न घेता त्यावर टीका केली. चित्रपट, मीडिया तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐतिहासिक तथ्य चुकीच्या पद्धतीने दाखवून जनतेच्या भावना भडकवण्याचं काम करत आहेत. यामुळेच अशा घटना घडत आहेत, असे सांगतानाच त्यांनी कबरीबाबत चिंता व्यक्त केली. तेथे आता सुरक्षा रक्षकांची व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.