विशेष प्रतिनिधी
पुणे : आषाढी एकादशी यात्रा २०२५ करिता मानाच्या १० पालख्यांसोबतच्या १ हजार १०९ दिंड्यांना प्रती दिंडी २० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे.
( Twenty thousand rupees subsidy for Dindis during Ashadhi Wari)
गतवर्षी आषाढी एकादशी यात्रा सन २०२४ करिता मानाच्या १० पालख्यांसोबत येणाऱ्या प्रत्येक दिंडीला २० हजार रुपये इतके अनुदान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत देण्याबाबत प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार २०२३-२४ मध्ये विभागीय आयुक्त, पुणे यांचेकडून एकूण १ हजार १०९ दिंड्यांची यादी प्राप्त झाली होती.
यावर्षीदेखील दिंड्यांना प्रतिदिंडी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण २ कोटी २१ लाख ८० हजार रुपये अनुदान वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई येथे बैठक घेऊन पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना उत्तम सुविधा देण्याचे निर्देश दिले आहेत. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनीदेखील आवश्यक सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ग्वाही दिली आहे. प्रशासनातर्फे व्यापक स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. मागील वर्षाप्रमाणे यावर्षीदेखील प्रत्येक दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याने दिंडीतील वारकऱ्यांसाठी अधिक सुविधा उपलब्ध होऊ शकतील.