विशेष प्रतिनिधी
पुणे: दोन मोक्का गुन्ह्यांत मागील तीन वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला वारजे माळवाडी पोलीसांच्या तपास पथकाने शिवणे येथून जेरबंद केले. ( Two accused in Mokka crimes who were absconding for three years arrested)
आकाश सिब्बन गौड (वय २३, रा.शिवणे, मुळ रा. गोरखपुर, उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी तसेच मार्केट यार्ड पोलीस ठाण्यांत मोक्कासह इतर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, ५ ऑटोबर २०२२ रोजी आरोपीने क्रिकेट खेळत असताना जुन्या भांडणाच्या रागातून आरोपीने शुभम मानकर याला कोयत्याने, लाकडी दांडक्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात मोक्कासह खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातही गौड याच्याविरुध्द दरोडा तसेच मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक रवाना केले होते. पथकाने आरोपीची माहिती काढून उत्तरप्रदेशातील गोरखपूर या मुळगावी भेट दिली. तिथे त्याच्या मित्र-मैत्रिणींकडे तपास करण्यात आला. तेव्हा आरोपी तेलंगणा येथे राहत असल्याचे समोर आले. मात्र तेलंगणामध्येही तो वेगवेगळ्या ठिकाणी राहत असल्यामुळे पोलिसांना त्याच्या वास्तव्याबद्दल माहीती मिळत नव्हती.
दरम्यान, २६ जून रोजी उपनिरीक्षक नरळे यांना गुप्त बातमीदाराकडून समजले की, आरोपी गौड हा हा शिवणे येथील एनडीए मैदानावर आला आहे. पोलिसांनी तत्काळ तिथे पोहचून त्याला ताब्यात घेतले. २०२२ चा गुन्हा असून याबाबतचा तपास करून चार्जशीट याधीच दाखल करण्यात आले आहे. आरोपीला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.
अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे, उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे, निरीक्षक निलेश बडाख यांच्या देखरेखीत उपनिरीक्षक संजय नरळे, अंमलदार सागर कुंभार, गणेश शिंदे, योगेश वाघ, अमित शेलार, बालाजी काटे, निखील तांगडे, शरद पोळ, अमित जाधव, अमोल झणझणे, गोविंद कपाटे यांनी ही कामगिरी केली.