विशेष प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्श हिट अँड रन प्रकरणातील निलंबित पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवण्यात आला आहे. (Two police officers in Kalyaninagar Porsche hit and run case to be dismissed)
या हिट अँड रन प्रकरणात न्यायलयाने अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा दिली होती मात्र त्यानंतर या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झाल्याने या प्रकरणाची चर्चा संपूर्ण देशात सुरु झाली होती. तर आता या प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठा निर्णय घेत दोन अधिकाऱ्यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठविला आहे.
पुण्यातील कल्याणीनगर परिसरात गेल्यावर्षी झालेल्या हिट अँड रन प्रकरणामुळे (Porsche Hit And Run Case) संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली होती. या प्रकरणात एका अल्पवयीन मुलाने पोर्श कारने रस्त्यावरून चाललेल्या तरुण आणि तरुणीला धडक दिली होती ज्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला होता.
राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी अशी या दोन पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत.
तपास करताना या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले होते. त्यांची चौकशी देखील सुरु करण्यात आली होती. आता त्यांची चौकशी पूर्ण झाली असून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांना पोलीस दलातून बडतर्फ करण्याचा प्रस्ताव पुणे पोलिसांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे पाठवले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली
24 मे 2024 रोजी या प्रकरणाचा तपास करताना पोलीस अधिकारी राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी निलंबित केले होते. त्यांची विभागीय चौकशी सुरू होती आणि या चौकशीत दोन्ही अधिकारी दोषी आढळ्याने त्यांना पोलीस खात्यातुन बडतर्फ करण्यात यावा असा प्रस्ताव पोलीस महासंचालकांना पाठविण्यात आला असल्याची माहिती अमितेशकुमार यांनी दिली.