विशेष प्रतिनिधी
चाकण : चाकण-आंबेठाण रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर चालकाने ओव्हरटेक करताना धक्का दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा दुर्दैवी अंत झाला. दोघांनाही चाकात अडकलेल्या अवस्थेत कंटेनरने वेगात पंधरा ते वीस फूट फरफटत नेले. शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास बिरदवडीगावाजवळ हा अपघात झाला. ( Two youths die in a horrific accident on Chakan-Ambethan road get stuck in the wheels of a container and are dragged )
सुजय दिलीप कडूसकर (वय १७) आणि सोहम उल्हास कडूसकर (वय १७, दोघे रा. कोरेगाव बुद्रुक) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या युवकांची नावे आहेत. योगेश विष्णू कड (३५, रा. किवळे, ता. खेड) यांनी चाकण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून गणेश वसुदेव मायकर (३०, रा. साळींबा, ता. वडवणी, जि. बीड) या कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजय कडूसकर आणि सोहम कडूसकर हे दोघे कामानिमित्त दुचाकीने चाकणकडे जात होते. बिरदवडी गावच्या हद्दीतील पवार वस्ती येथे कंटेनरचालक गणेश मायकरने भरधाव वेगाने दुचाकीस ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरील सुजय आणि सोहम यांच्या दुचाकीस जोराची धडक दिली. यामध्ये सुजय आणि सोहम हे दोघे कंटेनरच्या चाकाखाली आले.दोघांनाही चाकात अडकलेल्या अवस्थेत कंटेनरने वेगात पंधरा ते वीस फूट फरफटत नेले. फिर्यादी योगेश कड यांनी कंटेनरचालकाला गाडी थांबवण्यासाठी आवाज दिला; परंतु तो थांबत नसल्याने आजूबाजूच्या लोकांनी आवाज देऊन कंटेनर चालकास थांबवले. जखमींना त्वरित चाकण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचाराअगोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.