विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी भारताच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला असून, दहशतवादाविरोधातील लढ्यात अमेरिका भारतासोबत असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, दोन्ही देशांनी संयम बाळगावा व युद्ध टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
( U.S. Stands with India Against TerrorismUrges Restraint to Avoid WarSecretary of State Marco Rubio)
बुधवारी मध्यरात्री रुबियो यांनी भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. या चर्चेत त्यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध करत भारताला पूर्ण सहकार्याची ग्वाही दिली.
भारताने हल्ल्यानंतर कठोर भूमिका घेतली असून, जबाबदार ठरवण्यात येणाऱ्या घटकाविरुद्ध निर्णायक कारवाईचा इशारा दिला आहे. सैन्यालाही आवश्यक ती मुभा देण्यात आली आहे. पाकिस्तानचे मंत्री असा दावा करत आहेत की भारत येत्या २४–३६ तासांत हल्ला करू शकतो.
या पार्श्वभूमीवर, मार्को रुबियो यांनी दोन्ही देशांनी शांतता राखावी, तणाव न वाढवता संवादाच्या माध्यमातून तोडगा काढावा, असा सल्ला दिला. पाकिस्तानशी बोलताना त्यांनी हल्ल्याच्या चौकशीत पूर्ण सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली आणि या प्रकाराचा स्पष्ट शब्दांत निषेधही केला.
पाकिस्तानकडून मात्र भारतावर आरोप करण्यात आला असून, अमेरिकेने भारतावर दबाव आणावा अशी मागणी शहबाज शरीफ यांनी केली. शिवाय सिंधू जल कराराचाही मुद्दा उपस्थित करत, या करारातून मिळणारे पाणी पाकिस्तानातील २४ कोटी लोकांच्या जीवनाशी निगडित असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दक्षिण आशियात शांतता व स्थैर्य राखण्यासाठी भारत आणि पाकिस्तानने संयमी पावले उचलावीत, अशी भूमिका अमेरिकेने स्पष्ट केली आहे.