विशेष प्रतिनिधी
मुंबई : उद्धव आणि राज हे ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी सकाळी शिवतीर्थ निवासस्थानी मनसे प्रमुख राज ठाकरेंची भेट घेतली. आगामी महापालिका निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्या आहे. मात्र ही अराजकीय भेट होती, असे सामंत यांनी सांगितले आहे. (Uday Samants apolitical meeting with Raj Thackeraybut discussions will definitely take place!)
गेल्या काही दिवसांतील उदय सामंत आणि राज ठाकरे यांची ही चौथी भेट आहे. त्यामुळे शिंदेसेना आणि मनसे यांच्यात युतीची चर्चा सुरू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र राज ठाकरेंसोबतच्या भेटीत राजकीय नाही तर इतर विषयांवर चर्चा झाली असा दावा मंत्री उदय सामंत यांनी केला आहे
सामंत म्हणाले की, सकाळी या भागात काही कामानिमित्त आलो होतो. त्यावेळी मी स्वत: राजसाहेबांना फोन करून भेटीची विनंती केली. त्यानंतर इथं आलो. राज ठाकरेंशी गप्पा मारल्यानंतर अनेक विषय कळतात. मुंबईच्या विकासाबाबत चर्चा होते. जी काही चर्चा झाली. त्यात पुढे कसे जायचे त्यावर विचार केले जातात. त्याशिवाय तुमच्या मनात जे इतर राजकीय शंका आहे. त्यावर कसलीही चर्चा झाली नाही. चहा प्यायलो, खिचडी खाल्ली आणि निघालो. मुंबई महापालिकेबाबत चर्चा झाली असती तर तसे जाहीर करायला काही हरकत नव्हती. माझी ही चौथी भेट आहे. त्याचे उत्तर जे पहिले दिले तेच आज उत्तर आहे .
आमच्या आजच्या भेटीत कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही. या भागातून चाललो होतो, त्यामुळे राज ठाकरेंची भेट घेतली. राजकारणापलीकडचे काही संबंध असतात. उद्या संदीप देशपांडे मी चालता चालता भेटलो तर युतीची चर्चा होते असं नाही. काही भेटी अराजकीय असतात. आपणही या भेटींकडे राजकीय बघू नये. मी इथून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला जाणार आहे. त्यामुळे मी राज ठाकरेंच्या भेटीतील निरोप घेऊन शिंदेंच्या भेटीला चाललो आहे अशा बातम्या लावाल. मात्र असं काही झाले नाही, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, राजकीय सोडून इतर विषयांवर चर्चा झाली. सगळ्या चर्चा सांगायच्या नसतात. ज्यावेळी खऱ्या अर्थाने राजकीय चर्चा करायच्या असतील तेव्हा अख्खी मोठी पत्रकार परिषद घेऊन मी आणि संदीप देशपांडे सांगू असेही सामंत म्हणाले.
उबाठाचे अनेक नेते, महिला आघाडीच्या नेत्या, युवासेनेचे नेते पक्ष सोडतायेत. त्याचे आत्मचिंतन उबाठाने केले पाहिजे. उबाठातून जास्तीत जास्त लोक आमच्याकडे येत आहेत. एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व ते स्वीकारत आहेत. . शिंदे यांच्या कामाच्या पद्धतीने ते प्रभावित होत आहेत, असेही सामंत यांनी सांगितले.