पुणे : संजय राऊत वगैरे खूप छोटी माणसं आहेत. पंतप्रधान मोदी समजायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळीला वेळ लागेल, असा घणाघात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. ( Uddhav Thackeray and His Flock Will Take Time to Understand PM Modi Chandrashekhar Bawankules Sharp Attack)
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. पाकिस्तानला धडा शिकवण्याऐवजी मोदी कार्यक्रमांत हास्यविनोद करत फिरत आहेत, असे ते म्हणाले. यावर पुण्यात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले,
संजय राऊत यांना टीका-टिप्पणी व्यतिरिक्त दुसरी भाषा येत नाही. त्यांची वक्तव्ये समाजात तेढ निर्माण करणारी असतात. संजय राऊत वगैरे खूप छोटी माणसं आहेत. पंतप्रधान मोदी समजायला उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पिलावळ्यांना वेळ लागेल.
बावनकुळे म्हणाले, राष्ट्रकल्याणाकरता या देशातील कोणत्याही व्यक्तीला हानी होऊ न देता पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तान आणि नक्षलवाद्यांचा बीमोड केल्याशिवाय राहणार नाहीत. संजय राऊतांच्या चिथावणीखोर वक्तव्यांकडे लक्ष देण्याची गरज नाही. ते सामाजिक स्वास्थ्य खराब करत असतात.पंतप्रधान योग्य वेळी योग्य निर्णय घेत असतात. एकशे चाळीस कोटी भारतीयांना सुरक्षित ठेवण्याचे काम ते करतात.
संजय राऊत आता काँग्रेसमय झाले आहेत. त्यांनी आता काँग्रेसचे संविधानच स्वीकारले आहे. त्यामुळे ते काँग्रेसची भाषा बोलतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
लाडकी बहीण योजनेसाठी समाजकल्याण विभागाचा निधी वळविल्याने मंत्री संजय शिरसाट यांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर प्रचंड संताप व्यक्त केला आहे. यावर बावनकुळे म्हणाले, लाडकी बहीण योजना सर्वच समाजाची आहे. त्यामध्ये अनुसूचित जाती जमाती, आदिवासी या सगळ्याच प्रवर्गातील लाडक्या बहिणी आहेत. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपला वाटा दिला तर हरकत नाही. सामूहिक निर्णय घेतल्यावर तो सर्वांसाठीच बंधनकारक असतो.