विशेष प्रतिनिधी
मुंबई : नाशिक येथील शिवसेना ठाकरे गटाचे मोठे नेते सुधाकर बडगुजर यांनी मोठे शक्तिप्रदर्शन करत मुंबई येथील भाजप कार्यालयात पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने बडगुजर यांचे कार्यकर्ते उपस्थित होते. ( Uddhav Thackeray suffers setback in NashikSudhakar Badgujar joins BJP)
नरीमन पॉइंट येथील भाजप कार्यालयाच्या रस्त्यावर ढोल ताशे वाजवत हजारो कार्यकर्त्यांसह सुधाकर बडगुजर उपस्थित झाले होते. त्यानंतर भाजप कार्यालयात त्यांनी प्रवेश केला. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन उपस्थित होते. परंतु यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व रवींद्र चव्हाण हे लवकर न पोहोचल्याने सुधाकर बडगुजर यांना ताटकळत थांबावे लागल्याचे दिसून आले.
आज माझा भाजपमध्ये प्रवेश झाला त्यामुळे मी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांचे मी मनापासून आभार मानतो. गिरीश महाजन खरोखरच संकटमोचक आहेत आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापन आहे. आपत्ती आली की ते मार्ग काढतातच आणि माझ्याबाबतीत त्यांनी मार्ग काढला, असे म्हणत सुधाकर बडगुजर यांनी कौतुक केले आहे. आपल्या पर्यंत, पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहिती नाही. पण मी समाजाची सेवा करतो, समाजासाठी झटतो. कोणी बाहेर येत नव्हते त्या काळात कोविड सेंटर चालू केले आणि पक्षासाठी काम केले, असे बडगुजर यांनी सांगितले.
ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिका निवडणुकीत दूध का दूध पाणी का पाणी होईल, असे म्हणत बडगुजर यांनी शिवसेना ठाकरे गटाला इशारा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा दृष्टी असलेला नेता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे. बावनकुळे साहेब आपण जे काम सांगाल ते मी करेल आणि पक्षाने दिलेली जबाबदारी पार पाडेल, असे त्यांनी सांगितले
सुधाकर बडगुजर यांच्यासोबत बबनराव घोलप यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी बोलताना ते म्हणाले की बडगुजर साहेबांचा पक्षात अपमान झाला म्हणून मी त्यांच्यासोबत पक्षात प्रवेश करत आहे. सामान्य जनतेचा सन्मान होत नाही, मग अशा ठिकाणी कशाला राहायचे. येणाऱ्या सर्व निवडणुकीत आपण आपला खाक्या आहे तो दाखवून देऊ आणि भाजपला विजयी करू.
गिरीश महाजन म्हणाले, सगळीकडे चर्चा सुरू होती प्रवेश कधी होणार? अखेर आज तो दिवस आला. आपल्याला कल्पना आहे निवडणुका समोर आहेत आणि नाशिक जिल्हा आपला बालेकिल्ला आहे. आता आपल्याला अब की बार 100 के पार करायचा आहे, अशी घोषणा देखील दिली. पक्ष मोठा करणे दलाली नाही, पक्ष मोठा करणे हा प्रामाणिकपणा आहे. अनेक लोक त्यांना कंटाळले आहेत आणि म्हणून सगळे पक्षात प्रवेश करत आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य कशा पद्धतीने काम करत आहे, त्यावर जनतेचा विश्वास आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल, उबाठा असेल, काँग्रेस असेल आता जनतेचा विश्वास या पक्षांवर राहिला नाही.
रविंद्र चव्हाण म्हणाले, आज नाशिक या जिल्ह्यात आपण सर्व बडगुजर साहेब असतील आणि त्यांच्या सोबत असलेले सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी या सर्वांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, मी आपल्या सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी आणि गिरीशजी आम्ही सर्व तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की तुम्ही सर्वांनी जो भाजपवर विश्वास दाखवला आहे त्याला आम्ही तडा जाऊ देणार नाही. येणाऱ्या काळात भाजप आणि आपली विचारधारा सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध राहू.
पक्षात मनभेद नाहीत, मतभेद आहे, ते दूर होईल याचा विश्वास आहे. कोणी एखाद्या पक्षात असतो तेव्हा तो वाढवण्यासाठी पुढे जात असतो. कधी शिंतोडे उडवतो. मात्र, आता जबाबदारी आहे की जुन्या नव्यांना घेऊन पुढे जायचं आहे. ज्या पक्षाला आयुष्य देतो तिथे अपमान होत असेल आणि काळजी घेतली जात नसेल तर बरोबर नाही. नाशिकात येईल तेव्हा मेळावा घेऊयात, जे राहिले आहेत त्यांचा पक्षप्रवेश करुयात. भाजप तुमची प्रतिष्ठा कधीही कमी होऊ देणार नाही. पक्षात कधी वाटणार नाही कधी की नवीन घरात गेलोय. जुन्या नव्या कार्यकर्त्यांना एकत्र करत सर्वांनी राहावं इतकीच विनंती करतो.