विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपण उद्धवजींना आणि त्यांच्या शिवसेनेला शरद पवार आणि काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवले. त्यामध्ये एवढी दलाली केली, तेवढी दलाली आजपर्यंत कोणीही केली नसेल. तुम्ही राजकीय दलाली केल्यामुळेच उद्धवजींची सेना संपली आहे, असा पलटवार जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे.
( Uddhavjis Shivsena ended only because of your political brokerage Girish Mahajans counterattack on Sanjay Raut)
गिरीश महाजन म्हणजे पक्ष फोडायला नेमलेला दलाल आहे. ज्या दिवशी आमच्याकडे सत्ता असेल, त्या दिवशी पक्ष बदलणारा पहिला माणूस गिरीश महाजन असेल, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर केली होती.
यावर गिरीश महाजन म्हणाले की, संजय राऊत आपण ज्या पद्धतीने वागतात, ज्या पद्धतीने आपण बडबड केली आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणी शिल्लक राहिलेले नाही. उद्धवजींनी त्यांना जर आवरले नाही तर पुढे त्यांच्याकडे कोणीही राहणार नाही. सगळी शिवसेना जमीनदोस्त होणार आहे. संजय राऊत मी तर पक्षाचा पाईक आहे. मी 35 वर्षापासून निवडून येत आहे. मी कोण आहे? काय आहे? हे सर्वांना माहित आहे. पक्षासाठी मी काहीही करेल. पक्षवाढीसाठी मी करेल. तुमच्यासारखं पक्षाला रसातळाला नेण्यासाठी मी दलाली करणार नाही.
गिरीश महाजन म्हणाले की, दलालीचा विषय काढाल तर कोरेगावच्या पत्राचाळीमध्ये आपण काय केले? किती दिवस जेलमध्ये राहिलात? आम्हाला बोलायला लावू नका. बाळासाहेबांच्या विचाराला तुम्ही तिलांजली दिली. उद्धवजींच्या शिवसेनेला खुशाल तुम्ही काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसवलं. सगळी शिवसेना तुम्ही संपवली आणि तुम्ही काय गप्पा करतात? अजूनही तुमची बडबड बंद झाली नाही तर उद्धवजींचं देव भलं करो.