विशेष प्रतिनिधी
पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या संवेदनशील प्रकरणात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नव्हती. तरी देखील राज्य महिला आयोगाने स्वतःहून सुमोटो प्रकरण दाखल करून यामध्ये हस्तक्षेप केला आणि यामुळेच ही घटना उघडकीस आली, असा दावा आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केला आहे. ( Rupali Chakankar claims that the Womens Commissions suo moto action was behind the revelation of the Vaishnavi Hagavane case)
रुपाली चाकणकर यांनी वैष्णवीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत हा खुलासा केला. त्यांनी सांगितले की, “ही घटना समजताच मी १९ तारखेला सुमोटो तक्रार दाखल केली आणि ती बावधन पोलिसांकडे पाठवली. त्यानंतर गुन्हा नोंदवला गेला. आज मी वैष्णवीच्या आईवडिलांशी पुन्हा बोलले. त्यांनी हगवणे कुटुंबाविरोधात आणखी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली असून त्यानुसार पोलिसांना सप्लिमेंटरी गुन्ह्यांचे आदेश देण्यात आले आहेत.”
चाकणकर यांनी यावेळी तपास अधिकाऱ्यांचे कौतुक करत सांगितले की, “पोलिसांनी चांगल्या पद्धतीने तपास केला असून सायबर व क्राईम टीमही कार्यरत आहे. वैष्णवीच्या बाळाला तिच्या आईवडिलांकडे सुपूर्त करण्यात आले आहे.”
6 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 11:50 वाजता करिष्मा हगवणे हिने आयोगाला मेलद्वारे तक्रार पाठवली होती. त्या दिवशीच मयुरी हगवणेचा भाऊ मेघराज जगतापनेही आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. 7 तारखेला सकाळी 11.30 वाजता आयोगाने दोन्ही तक्रारी बावधन पोलिसांना पाठवून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर दोन्ही एफआयआर स्वतंत्ररित्या दाखल करण्यात आले. चाकणकर यांनी स्पष्ट केले की, “ही प्रकरणं कौटुंबिक असल्यामुळे कौन्सिलिंग करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला गेला होता.”
चाकणकर म्हणाल्या, हुंडाबंदीचा कायदा असूनही अशा घटना घडतात, याचं दुःख वाटतं. काल नागपूरमध्येही हुंड्यासाठी एका महिलेने आत्महत्या केली. माझ्या मुख्य कार्यालयात आतापर्यंत 35,971 तक्रारी आल्या असून त्यापैकी 35,282 निकाली काढल्या आहेत. आयोग काही करत नाही, असा आरोप करणाऱ्यांना हा डेटा उत्तर आहे. मला बोलायचं नव्हतं, पण विरोधकांनी दोन दिवस ‘चिल्लर’ गोंगाट केला, म्हणून स्पष्टीकरण द्यावं लागलं.”
दरम्यान, वैष्णवी हगवणे प्रकरणात आता तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे यांना अटक करण्यात आली आहे. याआधी तिचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रकरण गंभीर वळणावर असून पोलिस तपास अधिक गतीने सुरू आहे.