विशेष प्रतिनिधी
मुंबई : आषाढी वारीत अर्बन नक्षलींचा शिरकाव होत असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी केला. त्यांच्या आरोपावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (Urban Naxalites involved in Ashadhi WariMLA Manisha Kayande alleges in Legislative Council)
विधान परिषदेत पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मुद्दा मांडताना मनीषा कायंदे म्हणाल्या की, आषाढी वारीमध्ये देवाला न मानणाऱ्या नास्तिक लोकांचा मोठ्या प्रमाणावर शिरकाव झालेला आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. कारण हे अर्बन नक्षल संविधान दिंडी, पर्यावरण वारी आणि लोकायत यासारख्या वेगवेगळ्या नावाखाली वारीमध्ये जाऊन पथनाट्य करतात, भाषणं करतात आणि लोकांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार येत्या अधिवेशनात महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक आणणार आहे. हे विधेयक अशा व्यक्तींना अटकाव करण्यासाठी आहे.
मनीषा कायंदे म्हणाल्या की, यापूर्वी काही जणांकडून वारीवर मटणाचे तुकडे फेकण्याचा प्रकार घडला होता. बंडातात्या कराडकर यांनीही या प्रकारावर सविस्तर भाष्य केले आहे. तसेच या सर्व प्रकारावर त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. तसेच दोन दिवसांमध्ये आषाढी एकादशी येत आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर सरकारने तातडीने गंभीर कारवाई करावी, अशी मागणी मनीषा कायंदे यांनी विधान परिषद सभागृहात केली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकार या प्रकरणाची दखल घेत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.