विशेष प्रतिनिधी
पुणे : वैष्णवी हगवणे प्रकरणात दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप शशांक हागवणे याचे मामा आणि पुण्याचे कारागृह पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्यावर करण्यात आला होता. हगवणे याला शस्त्र परवान्यासाठी जालिंदर सुपेकर यांनी मदत केल्याचे समोर आल्यानंतर सुपेकर यांची उचल बांगडी करण्यात करण्यात आली आहे. सुपेकर यांची महाराष्ट्र होमगार्ड उपमहासमादेशक पदावर बदली करण्यात आली आहे. ( Use of pressure tactics in Vaishnavi Hagavane case IG Jalindar Supekar hastily transferred)
राज्याच्या गृह विभागाने जालिंदर सुपेकर यांच्या बदलीचे आदेश काढले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 च्या 22) याच्या कलम 22 न मधील तरतुदींनुसार, पुढील तक्त्यातील स्तंभ (2) मध्ये नमूद भा.पो.से. अधिकारी यांची, स्तंभ (3) मध्ये नमूद पदावरुन स्तंभ (4) मध्ये निर्दिष्ट पदावर, याद्वारे, प्रशासकीय कारणास्तव, बदलीने पदस्थापना करण्यात येत आहे, असे आदेशात म्हटले आहे.
त्यानुसार पुण्यातील कारागृह व सुधारसेवा विशेष पोलीस महानिरीक्षक पदावरुन जालिंदर सुपेकर यांची मुंबईत बदली करण्यात आली आहे. हा शासन आदेश, आस्थापना मंडळ क्र. 1 च्या शिफारशींचा यथायोग्य विचार करुन व महाराष्ट्र पोलीस अधिनियम (1951 चा 22) याच्या कलम 22 न मध्ये नमूद सक्षम प्राधिकारी यांच्या मान्यतेने निर्गमित करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. राज्य सरकारच्या गृह विभागाचे अवर सचिव संदीप ढाकणे यांच्या सहीने हा आदेश पारीत करण्यात आला आहे.
वैष्णवी हगवणे प्रकरणात दबावतंत्राचा वापर केल्याचा आरोप झाल्यानंतर आयपीएस जालिंदर सुपेकर यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. जालिंदर सुपेकर हे पुण्यातील येरवडा मध्यवर्ती कारागृहाचे महानिरिक्षक होते आणि त्यांच्याकडे संभाजी नगर, नाशीक आणि नागपुरच्या कारागृह उपमहानिरिक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. हा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून गुरुवारी (29 मे) काढून घेण्यात आला आहे. यानंतर आज वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांना जालिंदर सुपेकर यांच्या सहीने शस्त्रपरवाना मिळाल्याचे समोर आल्यानंतर त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे.