विशेष प्रतिनिधी
बीड : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या गाजलेल्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराडची बीड जिल्हा कारागृहात प्रकृती बिघडली आहे. कराडला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास जाणवत असल्याने तुरुंग प्रशासनाने त्याची वैद्यकीय तपासणी केली असून, सध्या त्याच्यावर डॉक्टरांचे लक्ष ठेवले जात आहे. तब्येतीत अधिक बिघाड झाल्यास त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात येईल, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. ( Valmik Karad accused in Sarpanch Santosh Deshmukh murder case health deteriorateswill be admitted to government hospital)
वाल्मीक कराड हे माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात. संतोष देशमुख यांची हत्या घडल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर मोठा राजकीय दबाव निर्माण झाला होता. अखेर त्यांनी प्रकृतीचे कारण पुढे करत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. या प्रकरणातील गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने राज्य सरकारने याच्या तपासात आणि खटल्यात कसूर न करता प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्याकडे वकीलपत्र सोपवले आहे. त्यामुळे खटल्याला वेग येणार असल्याचे संकेत आहेत.
दरम्यान, या प्रकरणाला नवे वळण देणारा आरोप निलंबित पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) रणजित कासले यांनी केला होता. त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “वाल्मीक कराडला बीडच्या तुरुंगात विशेष सोयीसुविधा पुरवल्या जात आहेत.” त्यांच्या म्हणण्यानुसार कराडला झोपण्यासाठी अतिरिक्त पांघरूण, चहा पिण्यासाठी स्वतःचा खास कप, तसेच इतर कैद्यांच्या नावावर रेशन मिळवले जात असल्याचे प्रकार सुरु आहेत. कासले यांनी याप्रकरणी गंभीर स्वरूपाची तक्रार करून कराडवर खरोखर कारवाई करायची असेल, तर त्याची तात्काळ दुसऱ्या तुरुंगात रवानगी करावी” अशी मागणी केली होती.
या प्रकरणातील सुनावणी बीड येथील विशेष मकोका न्यायालयात १७ जून रोजी होणार होती. मात्र, न्यायाधीशांच्या रजेमुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता २४ जून रोजी मंगळवारी खटल्यावर पुढील सुनावणी होणार आहे. या दिवशी तपास अधिकाऱ्यांचे जबाब, साक्षीदारांची उपस्थिती, तसेच कराडच्या तब्येतीच्या अनुषंगाने न्यायालय काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.