विशेष प्रतिनिधी
बीड ,: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप असलेला आरोपी वाल्मिक कराड याला बुधवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मात्र, त्याच दिवशी रात्री बीडच्या कारागृहात असलेल्या वाल्मिक कराडच्या पोटात अचानक दुखू लागल्याने आणि अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या वाल्मिक कराडवर आयसीयू विभागात उपचार सुरू आहेत. तसंच रुग्णालयात त्याची सोनोग्राफी करण्यात आली आहे. तसंच मधुमेह आणि रक्तदाबाची तपासणी देखील करण्यात आली. बुधवारी रात्री पावणे बाराच्या दरम्यान कारागृहातून त्याला रुग्णालयात दाखल केलं.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आत्तापर्यंत मंत्री धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याचा आरोप होत असलेल्या वाल्मिक कराडसह एकूण 9 आरोपींविरोधात मकोका कायद्यांतंर्गत कारवाई करण्यात आली आहे. याआधी न्यायालयानं वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यात कोठडी सुनावली होती.
बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांनी ९ डिसेंबरला निर्घृण पद्धतीने हत्या करण्यात आली. हे हत्या प्रकरण खंडणीशी संबंधित आहे. खंडणी प्रकरणी अटकेत असलेला आरोपी आणि मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आरोपी वाल्मिक कराड याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. काही दिवसांपूर्वीच वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यातही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड आहे. वाल्मिक कराडला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बीड कोर्टासमोर हजर करण्यात आलं त्यानंतर न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे एकत्र असल्याचं एक सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झालं आहे. हे फुटेज २९ नोव्हेंबरचं आहे असंही सांगितलं जातं आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड, अंजली दमानिया यांच्याही प्रतिक्रिया आल्या आहेत. वाल्मिक कराडने अवादा कंपनीकडे खंडणी मागितली, त्या दिवशीचं सीसीटीव्ही फुटेज असल्याचा दावा केला जातो आहे. केज शहरातील विष्णू चाटेच्या कार्यालयात वाल्मिक कराड २९ नोव्हेंबरला आला होता. त्यावेळी त्याच्यासह सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे हे सुद्धा या फुटेजमध्ये पाहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे केज पोलीस स्टेशनचे निलंबित पीएसआय राजेश पाटील हेसुद्धा यावेळी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेसोबत दिसत आहेत. वाल्मिक कराडविरोधात हा महत्त्वाचा पुरावा असल्याचं बोललं जातं आहे.