पुणे :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याविषयी समाज माध्यमावर आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यातील दोन आरोपींच्या अटकपूर्व व पाच आरोपींच्या नियमित जामीनावर उद्या निर्णय आहे. ( Verdict tomorrow on bail of accused in Amrita Phadnis defamation case)
भुमिश दीनानाथ सावे (वय ३८, रा. नालासोपारा) आणि अभिजित किरण फडणीस (वय ४४, रा. वसई) या दोन आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. निखिल जीवन संकपाळ (वय ३६, रा. कोथरूड), दत्ता तुकाराम चौधरी (वय ३७, धाराशीव), बळिराम जयवंत पंडित ऊर्फ अमित पंडित (वय ४२, रा. भांडूप) आणि आशिष दिगंबर वानखेडे (वय ३५, रा. अमरावती) आणि शैलेश नंदकिशोर वर्मा (वय ४७, रा. यवतमाळ) यांना अटक करण्यात आली आहे. त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. याबाबत ॲड. बसवराज मल्लिकार्जुन यादवाड (वय ४७, रा. शनिवार पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत म्हणणे मांडण्यासाठी सुनावणीला हजर राहण्याची नोटीस सत्र न्यायालयाने अमृता फडणवीस यांना नोटीस पाठवली आहे.
अमृता फडणीस यांच्यावतीने ॲड. एस. के. जैन यांनी बाजू मांडली. आरोपींच्या जामिनास सरकारी वकील राजेश कावेडिया यांनी विरोध केला. आरोपींनी केलेले वक्तव्य वादग्रस्त आहे. फडणीस या सामाजिक कार्यकर्त्या असून राजकीय हेतूतून हा गुन्हा करण्यात आला आहे. आरोपींनी एका ग्रुपच्या माध्यमातून हे कृत्य केले आहे. त्यांच्या पाठीमागे कोण आहे? या गुन्ह्याच्या सूत्रधार कोण आहे? याचा तपास करण्यात येत आहे. तसेच आरोपींनी या गुन्ह्यात वापरलेले मोबाईल व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करायचे आहे, त्यामुळे आरोपींचा जामीन फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. कावेडिया यांनी केला.