नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती म्हणून कार्यरत असलेले जगदीप धनखड यांनी आज अचानक राजीनामा दिला. त्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा सादर करत, वैद्यकीय कारणांमुळे आणि आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी हे पाऊल उचलल्याचे स्पष्ट केले. राजीनाम्याचा निर्णय तात्काळ प्रभावी मानण्यात आला असून, आता उपराष्ट्रपतीपद रिक्त झाले आहे.
( Vice President Jagdeep Dhankhar’s sudden resignation, step taken due to health reasons)
धनखड यांनी आपल्या राजीनाम्याच्या पत्रात नमूद केले आहे की, गेल्या काही महिन्यांपासून आरोग्यविषयक अडचणी भेडसावत होत्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, आता वैद्यकीय उपचारांवर आणि वैयक्तिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी पदत्याग करण्याचा निर्णय घेतला. आपल्या कार्यकाळात देशाने परिवर्तनाचा ऐतिहासिक काळ अनुभवला असल्याचेही त्यांनी नमूद करत, राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद सदस्य आणि जनतेचे विशेष आभार मानले आहेत.
२०२२ मध्ये उपराष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे सभापती म्हणून अनेक महत्त्वाच्या घडामोडींना मार्गदर्शन केले. त्यांनी संसदेतील शिस्त आणि चर्चेच्या दर्जावर विशेष भर दिला होता. अनेकदा त्यांनी विरोधकांवर कठोर भूमिका घेतली, तर काही वेळा सरकारलाही सूचक इशारे दिले. त्यामुळे त्यांचा कार्यकाळ लक्षवेधी ठरला होता.
राजीनामा सादर होताच राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटू लागल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले आणि त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या. काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आदी विरोधी पक्षांनीही त्यांच्या कार्यशैलीचा सन्मान करत त्यांना भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. संसदीय इतिहासात आरोग्य कारणास्तव एवढ्या मोठ्या पदावरून राजीनामा देण्याची घटना अत्यंत दुर्मीळ आहे.
राजीनामा पत्रात त्यांनी म्हटले आहे की, माननीय राष्ट्रपती जी.. माझ्या आरोग्याला प्राधान्य देणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करण्यासाठी, मी संविधानाच्या कलम 67(अ) नुसार माझ्या पदाचा राजीनामा देत आहे. मी भारताच्या राष्ट्रपतींचे मनापासून आभार मानतो. तुमचा पाठिंबा अढळ राहिला आणि त्यांच्यासोबतचा माझा कार्यकाळ शांततापूर्ण आणि अद्भुत होता. मी माननीय पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाचेही मनापासून आभार मानतो. पंतप्रधानांचे सहकार्य आणि पाठिंबा अमूल्य आहे आणि माझ्या कार्यकाळात मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. आदरणीय खासदारांकडून मला मिळालेले प्रेम, विश्वास आणि आपुलकी माझ्या कायम स्मरणात राहील. उपराष्ट्रपती म्हणून मला मिळालेल्या अफाट मोलाबद्दल, या महान लोकशाहीमध्ये मला मिळालेल्या अनुभवाबद्दल आणि ज्ञानाबद्दल मी कृतज्ञ आहे. या परिवर्तनाच्या युगात भारताच्या अभूतपूर्व आर्थिक प्रगती आणि जलद विकासाचे साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे हे माझ्यासाठी एक भाग्य आणि समाधान आहे. आपल्या देशाच्या इतिहासातील या महत्त्वाच्या काळात सेवा करणे हा खरोखरच सन्मान आहे. आज, मी हे सन्माननीय पद सोडत असताना, माझे हृदय अभिमानाने भरून आले आहे आणि भारताच्या कामगिरीवर आणि त्याच्या उज्ज्वल भविष्यावर अढळ विश्वास आहे.
२०२२ मध्ये, जगदीप धनखड यांनी १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत धनखड यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. एकूण ७२५ पैकी ५२८ मते धनखड यांना मिळाली होती, तर अल्वा यांना १८२ मते मिळाली होती.
धनखड यांच्या राजीनाम्यानंतर आता भारतीय राज्यघटनेनुसार निवडणूक आयोग नव्या उपराष्ट्रपतीसाठी निवडणुकीची घोषणा करणार आहे. लोकसभा आणि राज्यसभेच्या एकत्रित सदस्यांमार्फत ही निवडणूक पार पडते. या पार्श्वभूमीवर, सत्ताधारी भाजप आणि विरोधक कोणते उमेदवार रिंगणात उतरवतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या राज्यसभेचे उपसभापती तात्पुरत्या स्वरूपात सभापतीचे काम पाहतील. मात्र संसदेचे चालू पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने ही घटनात्मक पोकळी लवकर भरून काढावी लागेल. निवडणूक आयोगाकडून पुढील दोन आठवड्यांत निवडणुकीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
२०२२ मध्ये, जगदीप धनखड यांनी १४ वे उपराष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. ६ ऑगस्ट २०२२ रोजी झालेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत धनखड यांनी विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांचा पराभव केला. एकूण ७२५ पैकी ५२८ मते धनखड यांना मिळाली होती, तर अल्वा यांना १८२ मते मिळाली होती.
धनखड यांचा कार्यकाळ अल्पकालीन असला तरी प्रभावी राहिला. पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, शेतकरी कुटुंबातील माजी वकील आणि भाजपचे नेते अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या अचानक राजीनाम्याने राजकीय चर्चांना उधाण आले असून, देश आता नवीन उपराष्ट्रपतीच्या निवडीकडे लक्ष ठेवून आहे.