विशेष प्रतिनिधी
मुंबई : लंडनहून मुंबईकडे येणारे व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सचे (VS358) विमान तुर्कीतील दियाबाकीर या लष्करी विमानतळावर अचानक उतरावे लागल्याने निर्माण झालेल्या तांत्रिक आणि मानवी अडचणींनंतर अखेर सर्व २६० प्रवासी सुखरूप मुंबई विमानतळावर पोहोचले. शुक्रवारी रात्री ८.३० वाजता हे विशेष विमान मुंबईत उतरले.
( Virgin Atlantic flight carrying 260 Indian passengers stranded in Turkey lands safely in Mumbai)
विमानातील एका प्रवाशाला प्रवासादरम्यान तातडीच्या वैद्यकीय उपचारांची गरज भासल्याने विमानाला तुर्कीमधील दियाबाकीर या लष्करी विमानतळावर उतरणे भाग पडले. मात्र, हा विमानतळ आकाराने छोटा आणि लष्करी असल्यामुळे हार्ड लँडिंग झाल्याने विमानाच्या लँडिंग गियरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. त्यामुळे पुढील प्रवास खोळंबला.
दियाबाकीर विमानतळावर नागरी सोयी-सुविधा, संपर्क व्यवस्था आणि व्यावसायिक विमानांच्या दृष्टीने सुविधा अत्यंत कमी होत्या. विमानातील भारतीय प्रवासी अडकून पडले. या प्रवाशांपैकी काहींनी आपल्या ओळखीच्या व्यक्तींमार्फत नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी संपर्क साधून मदतीची विनंती केली.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मोहोळ यांनी त्वरित कारवाई करत हवाई मंत्रालयामार्फत संबंधित अधिकाऱ्यांशी आणि व्हर्जिन अटलांटिक एअरलाइन्सशी संवाद साधला. त्यानंतर विशेष पथक स्थापन करून परराष्ट्र मंत्रालय व तुर्कीतील भारतीय दूतावासाच्या सहकार्याने प्रवाशांना मदतीचा हात देण्यात आला.
प्रवाशांच्या निवास व अन्नपाण्याची तात्काळ व्यवस्था करण्यात आली. गर्भवती महिलांची आणि लहान मुलांची विशेष काळजी घेण्यात आली. वैद्यकीय सेवा पुरवण्यात आल्या. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी एअरलाइन्सने दुसरे विमान तुर्कीला पाठवण्याचा प्रयत्न केला, मात्र तुर्की सरकार आणि लष्कराकडून लष्करी विमानतळावर त्या विमानाला उतरण्यास परवानगी नाकारण्यात आली.
त्यानंतर भारत सरकारच्या हस्तक्षेपामुळे प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची परवानगी व तीन दिवसांचा ट्रान्झिट व्हिसा मिळाला. सतत पाठपुरावा करत तांत्रिक परवानग्या घेतल्यानंतर अखेर व्हर्जिन अटलांटिकचे विशेष विमान तुर्कीवरून उड्डाण करु शकले. हे विमान शुक्रवारी रात्री मुंबई विमानतळावर पोहोचले आणि सर्व प्रवासी सुखरूप घरी परतले.
संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देताना नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की, “आपत्कालीन परिस्थितीत भारतीय प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही सतत संबंधित यंत्रणांशी संपर्कात होतो. त्यांना दिलासा देणे हे आपले कर्तव्य आहे. सर्व प्रवासी सुखरूप घरी पोहोचल्याने समाधान वाटते.”