विश्व मराठी संमेलनात पुस्तक आदान-प्रदानाचा विशेष उपक्रम
विशेष प्रतिनिधी
पुणे : आपण वाचलेल्या पुस्तकाचा आनंद इतरांनाही घेता यावा, पुस्तकांच्या देवाण-घेवाणीतून वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, या हेतूने यंदाच्या विश्व मराठी संमेलनात ‘पुस्तक आदान-प्रदान’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. ( A special activity of book exchange at Vishwa Marathi Samelan)
मराठी भाषेच्या प्रचार प्रसाराच्या उद्देशाने राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आजपासून (३१ जानेवारी) ते २ फेब्रुवारीपर्यंत ‘विश्व मराठी संमेलन २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात हा आगळा-वेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या आवाहनानुसार, डोंबिवली येथील पै-फ्रेंड लायब्ररीतर्फे यंदाच्या विश्व मराठी संमेलनात हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमात वाचकांना त्यांनी वाचलेली पुस्तके देऊन त्या बदल्यात नवीन पुस्तके घेता येणार आहेत. अगदी कितीही पानांचे, कोणत्याही रकमेच्या पुस्तकांचे आदान-प्रदान वाचकांना करता येणार आहे, अशी माहिती उपक्रमाचे समन्वयक अमेय घैसास यांनी दिली.
पुस्तकांच्या देवाणघेवाणीच्या या उपक्रमातून साहित्याची आवड असलेल्या वाचकांना आपल्या जवळची जुनी-वाचलेली पुस्तके दुसऱ्या वाचकांना देण्याची संधी मिळते आणि त्या बदल्यात न वाचलेले दुसरे पुस्तक वाचनासाठी घेऊन जाता येते. त्यातून वाचकांच्या वाचनाची आवड आणि साहित्यविचारांचे आदान-प्रदान होणार आहे. त्यातून वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत मिळणार आहे.