पुणे: भरधाव पाण्याच्या टँकरने दुचाकीला उडविले. या अपघातात एका ३१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर महिलेचा पती आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास सातारा रस्त्यावर हा अपघात झाला. ( Water tanker hits bikewife dies husband, son seriously injured)
रूमी अजित पाल (वय ३१) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत अजित नारायण पाल (वय ३५, रा. कात्रज) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकरचालक अक्षय कुतवळ (वय ३५, रा. महर्षिनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास फिर्यादी त्यांची पत्नी रूमी आणि मुलगा प्रितम (वय १०) दुचाकीवरून घराकडे निघाले होते. सातारा रस्त्यावरील चव्हाण नगर कमान चौकात एका भरधाव पाण्याच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. टँकरचालकाने घटनास्थळावरून पळ काढला.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्तांना भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान रूमी पाल यांचे निधन झाले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.