विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकांनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला घरघर लागली असून अनेक प्रभावी नेते भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहेत. भाजप प्रवेशाची लाट आली असून काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे किल्ले ढासळू लागले आहेत. ( Wave of entry into BJP and Congresss crumbling fortress Entry of two former MLAs from North Maharashtra growing confidence in Devendra Fadnavis leadership)
नुकताच शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर आणि बबनराव घोलप यांनी भाजपात प्रवेश केला. या प्रवेशानंतर अजून एका महत्त्वाच्या घडामोडीने उत्तर महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अपूर्व हिरे हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. १ आणि २ जुलैला अनुक्रमे मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हे दोघेही भाजपात प्रवेश करतील. या पक्षप्रवेशांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांसाठी हा मोठा धक्का आहे.
कुणाल पाटील हे काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि माजी मंत्री स्व. रोहिदास पाटील यांचे पुत्र. त्यांच्या कुटुंबाने तीन पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. त्यामुळे कुणाल पाटील यांचा भाजपकडे कल ही एक राजकीय दृष्टीने मोठी घटना मानली जाते. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू होत्या. पाटील यांनी सतत नकारात्मक भूमिका घेत या चर्चांना नाकारले होते. परंतु कार्यकर्त्यांच्या वाढत्या दबावामुळे आणि भाजपकडून मिळालेल्या स्पष्ट आमंत्रणामुळे त्यांनी अखेर १ जुलै रोजी प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाटील यांनी स्वतः सांगितले की, २०१४ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पक्षात येण्यासाठी निमंत्रण दिले होतेआता कोणतीही अट न घालता, कोणतेही आश्वासन न घेता ते भाजपात प्रवेश करत आहेत. त्यांच्या मते, हा निर्णय केवळ कार्यकर्त्यांच्या इच्छेमुळे घेतला असून, यामागे कोणतीही पदलालसा नाही.
नाशिकमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार आणि प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अपूर्व हिरे हे २ जुलै रोजी भाजपात प्रवेश करणार आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी त्यांना दूरध्वनी करून पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित केले. हिरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्यानंतर आपला निर्णय निश्चित केला.
हिरे यांचाही पक्षप्रवेश केवळ त्यांच्या वैयक्तिक राजकीय प्रवासापुरता मर्यादित नाही, तर तो एक संकेत आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वही भाजपच्या विकासनिष्ठ धोरणांमुळे आकर्षित होऊ लागले आहे. हिरे यांचा भाजप प्रवेश म्हणजे नाशिकमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव कमी होत असल्याचे संकेत आहेत. दोघेही नेते आपल्या भागात प्रभावी आहेत. फक्त आपल्या भागातच नव्हे, तर सामाजिक, राजकीयदृष्ट्या प्रभावी घराण्यांचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला स्थानिक आणि आगामी महापालिका निवडणुकांमध्ये मोठा फायदा होईल, यात शंका नाही.
याउलट काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही स्थिती अत्यंत गंभीर आहे. काँग्रेसने गेल्या काही वर्षांत कमकुवत नेतृत्वामुळे अनेक प्रभावी नेते गमावले आहेत. राहुल गांधी यांचे नेतृत्व स्थानिक पातळीवर प्रभावी ठरत नाही, अशी टीका सातत्याने होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांचे नेतृत्व अधांतरी असून, अजित पवार यांच्या बंडामुळे पक्षाच्या संघटनात्मक स्थितीवरही परिणाम झाला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रात ‘विकासाभिमुख’मानले जाते. त्यांनी रस्ते, सिंचन, जलसंपदा, कायदा व सुव्यवस्था या क्षेत्रांमध्ये सातत्याने कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वामुळे विरोधी पक्षातील अनेक नेते भाजपकडे आकर्षित होत आहेत. या नेत्यांचा भाजपप्रवेश म्हणजे एक प्रकारे फडणवीसांच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब आहे.
सांगलीच्या जयश्री पाटील, धुळ्याचे कुणाल पाटील आणि आता नाशिकचे अपूर्व हिरे हे तिन्ही उदाहरणे हेच दाखवतात की महाराष्ट्रात भाजप एक प्रभावी पर्याय बनून उभा राहत आहे , विरोधी पक्षातील अनेक मोठे नेतेही यामुळे भाजपकडे आकर्षित होऊ लागले आहेत.
उत्तर महाराष्ट्रात भाजपने मोठी राजकीय मुसंडी मारली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पारंपरिक पक्षांचे गढ एका मागोमाग एक ढासळत आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थानच्या निवडणुकांमध्ये भाजपचा विजयाचा पाया अधिक मजबूत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाची जनतेमध्ये आणि नेत्यांमध्ये लोकप्रियता वाढत आहे. भाजपच्या छावणीत एकामागून एक होणारे पक्षप्रवेश पाहता हे निश्चित म्हणता येईल की, भाजप सध्या ‘राजकीय गरज’ नव्हे, तर प्रमुख ‘राजकीय पसंती’ ठरतो आहे.