विशेष प्रतिनिधी
मुंबई : दीपक काटे मला दोन तीन वेळा भेटला होता. काटेच्या कुठल्याही वाईट कृत्याला आमचे समर्थन नाही. समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा आमचा धंदा नाही. आम्ही विचारांची लढाई लढणारे आहोत. रस्त्यावर लढाई लढणारे नाहीत,असे उत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशध्यक्ष प्रवीण गायकवाड याना दिले आहे. ( We are fighting the battle of ideas Chandrashekhar Bawankules reply to Praveen Gaikwad)
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करत दीपक काटे याने त्यांच्या अंगावर काळे वंगण टाकले होते. यावर पुण्यात पत्रकार परिषद घेऊन गायकवाड यांनी आरोप केले. दीपक काटे हा चंद्रशेखर बावनकुळे यांना ‘गॉडफादर’ म्हणतो. बावनकुळे हे एका व्हिडिओत दीपक काटेला म्हणतात की, ‘तुम्ही काहीही करा, तुमच्यामागे देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत: आहे.’ दीपक काटेला एका कार्यक्रम देण्यात आला होता. माझ्यावरील हल्ला हा सरकार पुरस्कृत आहे, असा आरोप त्यांनी केला होता.
गायकवाड यांच्या आरोपाला उत्तर देताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, आमचे संस्कार आणि संस्कृती अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही. गायकवाडांवरील हल्ल्याला भाजपचे समर्थन नाही. दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे. प्रविण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा मी पहिल्यांदा निषेध व्यक्त केला. गायकवाडांवरील हल्ला आम्हाला मान्य नाही. दीपक काटेच्या पक्षप्रवेशाला अडीच वर्षापूर्वी गेलो होता, तेव्हा मी म्हणलेलं, ‘हा चांगला काम करेल. त्याच्या पाठीशी आम्ही आहोत.’ जेव्हा, पक्षात एखादा कार्यकर्ता येतो, हे आम्ही बोलतो. विचारांशी लढाई राहू शकते. पण, आमचे संस्कार आणि संस्कृती अशा भ्याड हल्ल्याला साथ देत नाही.
“दीपक काटेवर कारवाई झाली पाहिजे. पोलिसांनी काटेवर कारवाई केली आहे. अजून पोलीस कारवाई करतील. अशा हल्ल्यांचे समर्थन नाही. विचाराने लढाई लढू शकता. हल्ला करून लढाई लढू शकत नाही. दी समाजा-समाजात तेढ निर्माण करण्याचा आमचा धंदा नाही. आम्ही संस्कार आणि संस्कृतीने काम करणारे कार्यकर्ते आहोत, असेही बावनकुळे म्हणाले.
प्रविण गायकवाड यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. त्यात गायकवाड यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडिओ दाखवला आहे. त्यात बावनकुळे म्हणतात की, ‘दीपकअण्णाचा मला गर्व आहे, त्याला कुणीतरी गुन्हेगार ठरवलं होतं. गुन्हेगार ठरवून त्याच्यावर मागच्या सरकारच्या काळात अन्याय केला. मी दीपकला सांगितलं होतं, काही चिंता करण्याची गरज नाही. देवेंद्रजी आणि मी आपल्या पाठीमागे उभा आहे.’