विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गट आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चा सुरु असताना मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी शिवसेना ठाकरे गटावर शाब्दिक हल्ले सुरूच ठेवले आहेत. आता तर त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना पाय चाटले, जुने असून काय उपटली असे सवाल केले आहेत. मनसेच्या नेत्याच्या या वक्तव्यांमुळे ठाकरे गटात संताप निर्माण झाला आहे.
( We are new but we have not licked anyones feet MNSs Sandeep Deshpande takes a dig at Uddhav Thackeray)
संदीप देशपांडे यांनी काल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना चमचा म्हटले होते. आता तर त्यांनी थेट शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. देशपांडे यांनी x या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट करत ठाकरे गटावर जहरी टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, होय आम्ही नवीन आहोत, पण कधी ‘केम छो वरळी’ म्हणून कोणाचे पाय चाटले नाहीत.’जिलेबी अने फाफडा उद्धव ठाकरे आपडा’, असं म्हणालो नाही. मुस्लिमांची मत मिळवण्यासाठी 20 हजार केसेस आपल्याच भावाच्या कार्यकर्त्यांवर टाकल्या नाही. आम्हाला अभिमान आहे आम्ही नवीन आहोत. तुम्ही जुने असून काय उपटली?
संदीप देशपांडे यांच्या आक्रमक वक्तव्यांमुळे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती होण्याच्या आशा मावळत चालल्या असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
युतीसाठी सकारात्मक भूमिका घेणाऱ्या खासदार संजय राऊत यांच्यावरही देशपांडे यांनी काल शरसंधान केले होते. देशपांडे म्हणाले होते, ट्रम्पपासून गल्लीतल्या नगरसेवकाला प्रश्न विचारणारे आम्हाला सल्ले देतात की प्रश्न विचारू नका. मग आमचाही सल्ला आहे ताटातल्या चमच्यांनी ताटातच राहावं बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न करू नये.
जे बोलायचं आहे ते तुमचे आणि आमचे पक्ष प्रमुख बोलतील तुमची चमचेगिरी आणि चमकोगिरी बंद करा.
विशेष म्हणजे एरवी आक्रमक भूमिका घेणाऱ्या संजय राऊत यांनी या जहरी टीकेवर फारशी आक्रमक प्रतिक्रिया दिली नव्हती. संजय राऊत म्हणाले होते की राजकारणात माणसाने नेहमी संयमी आणि आशावादी असावं. काही लोकांना अजून त्याचं प्रशिक्षण घेण्याची गरज आहे. नुसता उथळपणा करून राजकारण चालत नाही. जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो, मराठी माणसाच्या न्यायी हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम ठेवावा लागतो. काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या इतकं कोणालाच माहीत नाही. कोण काहीही म्हणेल येड्या गबाळ्या सारख, त्याला अर्थ नाही.