विशेष प्रतिनिधी
नाशिक : मी शिवजयंती, आंबेडकर जयंतीमध्ये नाचतो. तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले असे विचारले तर काय होईल? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण मी असे एवढ्या खालच्या थराला जाणार नाही, असा पलटवार भाजप नेते तथा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे. ( What will happen if I ask who danced at your wedding Girish Mahajans counterattack on Sanjay Raut)
संजय राऊत यांनी सामना दैनिकाच्या अग्रलेखात महाजन यांना नाच्या म्हटले होते. यावर गिरीश महाजन पत्रकारांशी बोलताना म्हणाले, संजय राऊत मला नाच्या म्हणाले. ठीक आहे. मी शिवजयंतीला लेझीम खेळतो. ढोल वाजवतो. नाचतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती सोहळ्यातही मी नाचून आनंद व्यक्त करतो. रामनवमीलाही भगवा झेंडा घेऊन नाचतो. यात वावगे काय आहे? पण तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले? असे विचारले तर काय होईल? माझ्याकडे व्हिडिओ आहेत. पण मी असे एवढ्या खालच्या थराला जाणार नाही. संजय राऊत त्यांच्या पक्षाला नाशिकमध्ये लागलेल्या गळतीमुळे हताश झालेत. त्यातून ते अशा पद्धतीचे स्टेटमेंट करत आहेत.
शिवसेना ठाकरे गटाला उतरती कळा लागली आहे. संजय राऊत जिथे जातात, तिथे त्यांच्या पक्षाचे विघटन होते. आपल्या पक्षात आता कुणीच राहणार नाही हे त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते अशी विधाने करत आहेत, असा आरोप करून ते म्हणाले, मी गिरीश महाजन आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे. मी 20-25 वर्षे सत्तेविरोधात होतो. तेव्हाही मला आमिषे दाखवण्यात आली. पण केव्हाच कुणाला निरोप पाठवला नाही. मी उद्धव ठाकरे यांना केव्हा निरोप पाठवला हे त्यांनी मला सांगावे. मी त्यांना फोनही केला नाही आणि मदतही मागितली, असे ते म्हणाले.
गिरीश महाजन म्हणाले, संजय राऊत यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचा प्रभार आहे. ते जिथे प्रभारी होतात, तेथील शिवसेनेचे कार्यकर्ते सोडून जातात. त्यांना माहिती आहे, पक्षात कुणीही राहणार नाही. त्यामुळेच ते एकेकाची पक्षातून हकालपट्टी करत आहेत. आम्हीच त्यांची हकालपट्टी केली असे सांगण्यासाठी त्यांनी ही कारवाई केली. पण तिथे राहण्यास आता कुणीच उत्सुक नाही ही वस्तुस्थिती आहे. संजय राऊत जिथे जातात, तिथे ठाकरे गटाचे विघटन होते. नाशिकमध्ये आता तेच होणार आहे.
संजय राऊत यांनी नैराश्यातून सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी केली. बडगुजर त्यांच्या जवळचे होते. बडगुजर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. अनेक मोठे पदाधिकारी आमच्या संपर्कात आहेत. ते नाराज आहेत. अक्षरशः वैतागले आहेत, असेही गिरीश महाजन यावेळी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले.
ठाकरे गटाने बुधवारी सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी केली. बडगुजर हे नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर त्यांची भाषा बदलली होती. मी पक्षात नाराज आहे, असे ते उघडपणे म्हणाले होते. त्यामुळे ते भाजपच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात होता.