विशेष प्रतिनिधी
मुंबई: तुमची लेकरं कोणत्या मराठी शाळेत शिकलीत, त्यांची नावे आम्हाला सांगा? असा राज आणि उद्धव ठाकरे यांच्या मुलांच्या शिक्षणावर सवाल करत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमची लेकरं भाषेच्या दारिद्र्यात राहिली पाहिजेत. आमच्या लेकरांना जग समजता कामा नये. जग केवळ यांनाच समजता आलं पाहिजे म्हणूनच भाषेला विरोध केला जात असल्याचेही ते म्हणाले. (Which Marathi school did your children study inSadabhau Khots question to Raj and Uddhav Thackeray)
राज्य सरकारच्या त्रिभाषा सूत्राला विरोधकांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी 5 जुलै रोजी मोर्चाची घोषणा केली आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेनाही मोर्चात सहभागी होणार आहे. यावरमाध्यमांशी संवाद साधताना सदाभाऊ खोत म्हणाले की, प्रत्येकांचा अजेंडा ठरलेला आहे. मात्र, एक दुर्दैवाची बाब अशी आहे की, शेतकऱ्यांचा अजेंडा हा राजकारण्यांच्या दिशेने चाललेला दिसत नाही. मराठी भाषेच्या अजेंड्याचं आम्ही स्वागत करतो. मात्र, शेतकऱ्यांचा देखील अजेंडा असला पाहिजे होता. कारण पोटाची भूक माणसाला भाषा शिकवत असते आणि आमची मराठी भाषा चिरकाल टिकणार आहे. त्यामुळे सध्या मराठी भाषेवरील आक्रमणाची उठवलेली आवई हा ढोंगीपणा आहे. माझ्या लेकराला हिंदी आणि इंग्रजी आलं पाहिजे. कारण मला जगाबरोबर चालायचे असेल तर या दोन्ही भाषा आल्या पाहिजेत.
आंदोलनावर बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की, जे आज आंदोलन करत आहेत, त्यांना माझा साधा प्रश्न की, तुमच्या लेकरांना इंग्रजी येतं का? विमानात बसल्यावर तुमची मुलं इंग्रजीत बोलतात ना? तुमची लेकरं कोणत्या मराठी शाळेत शिकलीत, त्यांची नावे आम्हाला सांगा? या प्रश्नांची उत्तरे आम्हाला द्या. तुमच्या मुलांना शिकवणाऱ्या शिक्षकांचे आम्ही दर्शन घेऊ. कारण तुमची लेकरं फडफड इंग्रंजी बोलणार, चांगल्या शाळेत शिकणार, इंग्लंजी बोलणाऱ्या जगात जाणार, वेगवेगळे देश फिरणार आणि तुम्ही इथे सांगणार दुसरी भाषा शिकता कामा नये, असे म्हणत खोत यांनी टीका केली.
सदाभाऊ खोत म्हणाले की, महाराष्ट्रातल्या गावखेड्यातील लोकांनी मराठी भाषा जपली म्हणून आज संत तुकोबांची आणि ज्ञानोबाची दिंडी निघाली आहे. पारंपारिक मराठी भाषेचं संगीत वाजवत वारकरी पंढरपूरकडे निघाले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर मराठी भाषा जपायची असेल तर पंढरीच्या वारीला या. मुंबईत बसायचं आणि मराठी धोक्यात आली म्हणायचंय. खरं तर धोक्यात तुमच्या खुर्च्या आल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी माणसाची मराठी धोक्यात आलेली नाही. ही लढाई खुर्चीची आहे. परंतु लाखो लोक दिंडीत सहभागी होऊन मराठी वाढवत आहेत, तुम्ही काय वाढवत आहात? असा प्रश्न उपस्थित सदाभाऊ खोत यांनी केला.