विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद सुरु असताना मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांचा फोन आला आणि त्यांनी जाब विचारला. खुद्द संजय राऊत यांनीच शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. (While the press conference was going on Raj Thackeray called Sanjay Raut and asked for an answer!)
संजय राऊत म्हणाले, राज ठाकरेंचा फोन आला तेव्हा मी उद्धव ठाकरेंसोबत पत्रकार परिषदेत होतो. राज ठाकरे यांनीही एका आंदोलनाची घोषणा केली. त्याची कल्पना आम्हाला नव्हती. राज ठाकरे म्हणाले की मी उद्धव यांच्या ७ तारखेच्या मोर्चाचे ऐकले, मी आत्ताच ६ तारखेची घोषणा केली. मराठी माणसाच्या आंदोलनासाठी २ वेगवेगळे मोर्चे निघणे हे बरे दिसत नाही. हे एकत्रित आंदोलन झाले तर त्याचा जास्त प्रभाव पडेल आणि मराठी भाषिकांना त्याचा आनंद होईल. याबाबत त्यांच्याशी चर्चा झाली. मी उद्धव ठाकरेंसोबत यावर चर्चा करतो असं सांगितले आणि पुन्हा मातोश्रीत गेलो. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंचा निरोप सांगितला. त्यावर कुठलेही आढेवेडे न घेता उद्धव ठाकरे यांनी मराठी माणसांचे ऐक्य दिसणे गरजेचे आहे. आपण सगळे मराठी माणसे एकत्रित आहोत. ६ तारखेला आषाढी एकादशी आहे. त्यामुळे ७ तारीख ठरवली होती. जर आपण एकत्रित आंदोलन करणार असू तर काहीच हरकत नाही. ७ तारीख किंवा ५ तारखेला करू असं उद्धव ठाकरेंनी म्हटले. त्यावर मी राज ठाकरेंना सांगितले. त्यानंतर त्यांनी चर्चा करून ५ जुलै ही तारीख ठरवली.
संजय राऊत म्हणाले, हा राजकीय अजेंड्याशिवाय मोर्चा असेल. फक्त मराठी अजेंडा, कुठलाही झेंडा नाही हे ठरलेले आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं. दरम्यान, या आंदोलनाबाबत आणखी चर्चा होईल. सकाळी १० वाजताची वेळ कुणाला सोयीची नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून या मोर्चात लोक सहभागी होतील. त्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची चर्चा होईल. मोर्चा ५ तारखेला निघेल. वेळ मागे पुढे होईल त्याबाबत ठरवू .
मराठी भाषेचा आग्रह आणि हिंदी सक्तीविरोधात येत्या ५ जुलैला गिरगाव चौपाटीला भव्य मोर्चा काढण्याची घोषणा राज ठाकरे यांनी केली. या मोर्चात कुठल्याही राजकीय पक्षाचा झेंडा नसेल, हा मराठी माणसाचा मोर्चा असेल असंही राज यांनी स्पष्ट करत सर्व राजकीय पक्ष, साहित्यिक, कलाकारांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केले. संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात सध्या शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीचा विषय सुरू आहे. त्रिभाषा सूत्र या नावाखाली आमच्या मुलांवर हिंदी लादली जातेय. हे ओझे आमच्या मुलांना पेलवणार नाही. फक्त महाराष्ट्रात नाही तर इतर राज्यातही हे सुरू आहे. आमचा हिंदी भाषेला विरोध नाही पण शालेय शिक्षणात अशाप्रकारे महाराष्ट्रावर जबरदस्ती करता येणार नाही. यातून गुजरातला वगळले आहे. मराठी भाषिक संस्था एकत्र येत काम करत आहे. मराठी भाषेच्या विकासासाठी काम करणाऱ्या संस्थांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. जी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली ती उद्धव ठाकरे यांनीही मांडली. मराठी भाषा कृती समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह उद्धव ठाकरेंची भेट घेतली. चर्चा केल्यानंतर ७ जुलैला मराठी प्रेमी, मराठी भाषिकांना आंदोलनासाठी आमंत्रित केले. मराठीचा विषय असल्याने, हिंदी सक्तीचा विषय असल्याने काल तात्काळ पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे यांनी मराठी कृती समितीच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. या आंदोलनात शिवसेना उतरेल असं जाहीर केले असं त्यांनी सांगितले.