विशेष प्रतिनिधी
पुणे : जो बायकोच्या आड लपतो आणि सगळे उद्योग करतो, त्या मंत्र्याचा बळी जाईल, असे विधान खासदार सुप्रिया सुळे यांनी केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. ( Who is the minister hiding behind his wife? Supriya Sule’s revelation sparks political debate)
सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा आढावा बैठकीत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, शंभर दिवसांत एक बळी गेला आहे. सहा महिने थांबा आणखी एक बळी जाणार आहे. त्यांचे नाव आत्ताच जाहीर करणे योग्य नाही.राज्यातील एक मंत्री खूपच बोलत आहेत. परंतु ते बायकोच्या आड लपतात आणि बायकोच्या आडून बोलतात. हे डरपोक मंत्री कोण आहेत लवकरच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. चार-सहा महिन्यांत त्यांची विकेट पडेल.
“एवढी वर्षे आपण सत्तेत राहिलो. आता आपण विरोधी पक्षात आहोत. अरे बापरे.. आता विरोधी पक्षात राहून संघर्ष करायचा का? केवढा मोठा प्रॉब्लेम, ही मानसिकता मनातून काढून टाकून संघर्षासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उभे राहिले पाहिजे” अशी अपेक्षा सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली
यावेळी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटासह धनंजय मुंडेंवर जोरदार टीका केली. त्या म्हणाल्या,
मला कधी कधी वाटतं बरं झालं पक्ष फुटला. जो पुरुष स्वतःच्या बायकोच्या गाडीमध्ये बंदूक ठेवतो आणि तिला अडकवतो. काही नैतिकता आहे की नाही? अशा व्यक्तीबरोबर मी पक्षात काम करू शकले नसते. एक वेळ विरोधी पक्षांमध्ये आयुष्य काढेन, परंतु नैतिकता सोडणार नाही. एक तर ते पक्षात राहिले असते नाहीतर मी बाहेर पडले असते. बीडमध्ये जा, संतोष देशमुख यांच्या आईला भेटा. महादेव मुंडे यांच्या बायकोला भेटा. त्यांच्या लेकरांची काय चूक होती? पैसा आणि सत्तेच्या पुढे झुकणं बंद केले पाहिजे. अशा प्रवृत्तीच्या विरोधात लढलं पाहिजे.