विशेष प्रतिनिधी
मुंबई : वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातील संरक्षण विभागाच्या 42 एकर जमिनीवरील झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटाचे आमदार आमनेसामने भिडले. यावेळी 2019 ते 2022 पर्यंत काय केले हे सांगा म्हणत शंभुराज देसाई यांनी उद्धव ठाकरेंची कुंडलीच काढली. मी उत्तर देताना कोणत्याही मुख्यमंत्र्याचे नाव घेतले नाही. केवळ कालावधी सांगितला. मी सर्व काही रेकॉर्डवरील सांगितले. मी कुणाचे नाव घेतले नाही, तर एवढ्या नाकाला मिरच्या लागण्याचे काय कारण आहे? स सवालही त्यांनी केला.
(Why So SensitiveShambhuraj Desai Slams Uddhav Thackeray Says Hell Reveal His Entire Political Record)
वांद्रे येथील आमदार वरूण सरदेसाई यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विधानसभेत प्रश्न विचारला होता. त्यावेळी समाधानकारक उत्तर सरकारकडून आले नाही त्यावरून सरदेसाई यांनी मंत्र्यांना ब्रिफिंग झाले तेवढेच त्यांनी उत्तर दिले असेल. छापील उत्तरापलीकडे मंत्र्यांनी उत्तर दिले नाही असं म्हटले त्यावर शिंदेसेनेचे मंत्री संतापले. मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, मला या प्रकरणाच्या खोलात जायचे नव्हते परंतु माझ्याकडे अपुरे ब्रिफिंग आहे, जेवढे उत्तर दिले तेवढेच बोलायचे होते असं सांगण्यात आले. २०१९ ते २०२२ या अडीच वर्षाच्या काळात या प्रकरणाचा तत्कालीन राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा केला नाही असं सांगताच विरोधकांनी गोंधळ घातला. त्यावर आता ऐकून घ्या, १९ ते २२ या काळात काय झाले ते सांगा. एकही पत्र राज्य सरकारने दिले नाही. कुणाचे सरकार होते, २०२२ मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ४ वेळा पत्र देण्यात आली. तुम्ही काय केले..आमची लाज काढू नका, तुम्ही काय केले ते सांगा. आमची काय लाज काढता, तुम्ही काय केले नाही. आम्ही केले असं त्यांनी संतापून म्हटले.
मुंबईच्या झोपडपट्टीबाबत हा विषय महत्त्वाचा आहे. राज्य आणि केंद्र सरकारमध्ये सांगड असणे गरजेचे आहे. माझ्या मतदारसंघात एक झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प १७ वर्षापासून रखडला आहे. त्यात केंद्राच्या एनओसी आल्या नाहीत. महाकाली प्रकल्प का रखडला, अंधेरीतील जुहू एअरपोर्टजवळ झोपडपट्टी आहे तिथेही हाच प्रश्न आहे. मुंबईत अनेक केंद्रीय संस्था आहे. रेल्वे, विमानतळे, बीपीटी अशा संस्था आहेत. त्यामुळे या प्रकरणावर सरकारने आम्हाला सोबत घेत बैठक घेऊन यावर तोडगा काढायला हवा असं आमदार आदित्य ठाकरे म्हणाले.
त्यावर मंत्री शंभूराज देसाई उत्तर देत असताना विरोधकांनी पुन्हा गोंधळ घातला. तुमच्या नेत्याच्या प्रश्नाचे उत्तर देतोय, ते ऐकून घ्या, समाधान झाले नाही तर अध्यक्ष काय सांगायचे ते सांगतील असं त्यांनी म्हटलं. मुंबईतील रखडलेल्या गृहनिर्माण प्रकल्पाबाबत संबंधितांची बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून आपण केंद्राकडे पाठपुरावा करू असं मंत्र्यांनी उत्तर दिले. त्यावर २०१७ पासून या विषयावर लक्षवेधी लागतायेत टाईमबॉन्ड उत्तर द्यावे अशी मागणी करत आमदार वरूण सरदेसाई यांनी मंत्र्यांकडे ब्रिफिंग नाही असं विधान केले. त्यावरून मंत्री संतापले. यावर सत्ताधारी, विरोधक यांच्यात गदारोळ झाला.
त्यावेळी मंत्री गुलाबराव पाटील उभे राहिले आणि त्यांनी ठाकरे गटाच्या आमदारांवर आगपाखड केली. ते म्हणाले की, वरूण सरदेसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर मंत्री देसाई यांनी उत्तर दिले, इतरांनी प्रश्न विचारले त्यावर मंत्र्यांनी उत्तर दिले परंतु उत्तर देताना एखादी शंका असेल तर ती विचारा, ही चर्चा सुरू आहे. परंतु तुम्ही ब्रिफिंग घेऊन आले बोलता, तुम्ही जन्मत: हुशार होऊन आलात का, लाज काढायचा अधिकार कुणी दिला, तुमच्यापेक्षा जास्त बोलता येते मला असं गुलाबराव पाटील यांनी संतापून म्हटले.